gogate-college-autonomous-updated-logo

विद्यार्थांनी यशापयशाचा विचार न करता प्रगतीची शिखरे पादाक्रांत करावी – डॉ. इंदुराणी जाखड गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ संपन्न

gjc-padvidan-prog-2022-1

‘आपल्या जीवनात अनेक आकस्मिक वळणे येतात. अनेक वेळा ते आपल्याला समजतही नाही. परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून, आत्मविश्वासाने भविष्याकडे वाटचाल केली तर यश हमखास मिळते, विद्यार्थांनीही यशापयशाचा विचार न करता प्रगतीची शिखरे पादाक्रांत करावी’, असे मत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी व्यक्त केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित पदवीदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

मुंबई विद्यापीठाच्या मार्च-२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा पदवीदान समारंभ नुकताच महाविद्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. या पदवीदान सोहळ्यात मुंबई विद्यापीठात प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या अनुक्रमे नारायणी शहाणे (संस्कृत विभाग) आणि ऐश्वर्या आचार्य (संस्कृत विभाग), पीएच. डी. पदवी प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. मीनल खांडके यांच्यासह पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त १४ विद्यार्थांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येऊन गौरविण्यात आले.

डॉ. जाखड पुढे म्हणाल्या की, आपण कोणत्या महाविद्यालयातून शिक्षण घेतो याला आपल्या शैक्षणिक जीवनात खूप महत्वाचे स्थान असते. महाविद्यालय हे व्यक्तिमत्व विकासाचे साधन असून, विद्यार्थांनी अभ्यासाबरोबरच खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धामध्ये सहभागी होऊन आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास साधला पाहिजे. जीवनात निश्चित ध्येय ठेवून भविष्यात वाटचाल केल्यास यशाचे शिखर नक्कीच गाठता येते. त्यामुळे विद्यार्थांनी सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे पाहत वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थांना केले.

आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात महविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोगा मांडून प्राचीन भारतीय शिक्षण, त्यात झालेले काळानुरूप बदल, आगामी काळात येऊ घातलेले नवीन शैक्षणिक धोरण, कोरोनामुळे सद्यस्थितीत शिक्षणात घडून आलेले बदल, भविष्यात निर्माण होणारी आव्हाने अशा विविध बाबींवर पैलू टाकून शिक्षक-विद्यार्थांनी नवीन तंत्रज्ञान आत्मत्सात करून शिक्षण क्षेत्रातील नवीन बदलांना सामोरे गेले पाहिजे, असे मत व्यक्त केले. या नंतर प्राचार्य कुलकर्णी यांनी पदवीप्रदान विद्यार्थांना घ्यावयाची शपथ दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या, कोणतीही गोष्ट आपल्याला येत नाही म्हणून परत यायचे नाही. ती शिकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्यास ती निश्चितच येते. अपयशाने खचून न जाता प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते. परीक्षेत चांगले गुण मिळणे, शिक्षणानंतर उत्तम पगाराची नोकरी मिळणे म्हणजे चांगला माणूस घडणे असे नव्हे, तर त्याही पलीकडे जाऊन आपण आपला देश, आपल्या समाजासाठी काम करायला पाहिजे, सामाजिक उत्तरदायीत्वाचे भान येणे म्हणजे देशाचाएक चांगला, सुजाण नागरिक घडणे होय, असे सांगून शैक्षणिक जीवनात प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थांनीही काळानुरूप प्रगत होणे आवश्यक असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.

या प्रसंगी व्यासपीठावररत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. सतीश शेवडे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. चंद्रशेखर केळकर, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. डॉ. मेघना म्हादये यांनी केले. या कार्यक्रमाला तिन्ही शाखेचे उपप्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

ढोलताशांच्या गजरात रत्नागिरी शिक्षण संस्थेच्या कार्यालयापासून महाविद्यालयापर्यंत काढण्यात आलेली मिरवणूक ही या समारंभाची विशेष आकर्षण ठरली. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, श्री. प्रसाद गवाणकर, श्री. कुमार काकतकर यांच्यासह, कार्यालयीन कर्मचारी, समारंभ समिती सदस्य, सेवक वर्ग आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. कोरोनाविषयक शासकीय नियमावलींचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला.

gjc-padvidan-prog-2022-1
gjc-padvidan-prog-2022-2
Comments are closed.