मुंबई विद्यापीठाच्या मार्च २०२१मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाचे आयोजन शनिवार दि. ५ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयात करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात हा समारंभ संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड उपस्थित राहणार आहेत.
डॉ. इंदुराणी जाखड सन २०१६च्या तुकडीच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून आतापर्यंत त्यांनी उपविभागीय अधिकारी (गडचिरोली); आदिवासी विकास प्रकल्प, अहेरीच्या प्रकल्पअधिकारी; गडचिरोली जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केले आहे. जुलै २०२० पासून त्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
सदर पदवीदान समारंभात पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात विद्यापीठाची पदवी मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असून कोरोनाविषयक नियमावलीचे पालन करून विद्यार्थ्यांनी या समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.