रत्नागिरी शहरातील साहित्य आणि कला क्षेत्रात काम करणारी सुप्रसिद्ध संस्था ‘आर्ट सर्कल’ यांनी बोलभाषेतून व्यक्तीचित्रणात्मक कथा स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत देश-विदेशातील विविध १९ भाषांतील ३६ कथा सहभागी झाल्या होत्या. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे श्री. प्रसाद उर्फ बापू गवाणकर यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. पारितोषिकाचे स्वरूप प्रमाणपत्र आणि रोख रु. ५००० असे असून आर्ट सर्कलच्या सौ. दीप्ती कानविंदे आणि नयना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्राचार्य कक्षात प्रदान करण्यात आला. या प्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचे उपप्राचार्य अनुक्रमे डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. यास्मिन आवटे आणि डॉ. मिलिंद गोरे, डॉ. मकरंद साखळकर, श्री. दीपक जोशी आणि कु. पूर्वा गवाणकर उपस्थित होते.
बोलीभाषेतून व्यक्तीचित्रणात्मक कथा या साहित्य प्रकारामद्धे श्री. गवाणकर यांनी एका नावाड्याची कथा रेखाटली आहे. खेडेगावात पूर्वी खाडी ओलांडण्यासाठी पूल नव्हते; तेव्हा होडी हे गावकऱ्यांच्या जीवनातील एक अपरिहार्य असे साधन होते. खेडे गावातील खाडीत उपलब्ध असणारी होडी आणि नावाडी हे गावातील दळणवळण करणारे एक महत्वाचे माध्यम होते. कथेतील ‘गणपत’ ही व्यक्तीरेखा कोकणातील कष्टकरी माणसाचे खास असे प्रतिबिंब आहे. कोकणातील निसर्ग, मानवी व्यवहार, विविध नातेसबंध, व्यक्तिरेखा अशा बाबी या कथेत व्यक्त झालेल्या आहेत. श्री. गवाणकर यांच्या कथांना यापूर्वीही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
या पुरस्काराबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अध्यापक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी श्री. प्रसाद गवाणकर यांचे हार्दिक अभिनंदन केले असून पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.