र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातील माजी प्रा. सुरेश माणगावकर यांचे शनिवार दि. १० सप्टेंबर २०२२ रोजी मध्यरात्री वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रा. सुरेश माणगावकर हे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागात १९७२ ते २००३ या कालावधीत कार्यरत होते. यापूर्वी काही वर्ष त्यांनी मालवण येथे प्राध्यापक म्हणून काम केले होते. ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर २००३ मध्ये ते महाविद्यालयामधून सेवानिवृत्त झाले. सोमवारी राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या शोकसभेत भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. महेश बेळेकर यांनी प्रा. माणगावकर यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलुना उजाळा दिला. उत्कृष्ठ शिक्षक तसेच सहकारी म्हणून त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाचा त्यांच्या सहकारी शिक्षकांना आजही कसा उपयोग होत आहे याबाबत त्यांनी काही उदाहरणे सांगितली.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी त्यांच्या शोकसंदेशात प्रा. माणगावकर यांनी महाविद्यालय प्रशासनात पार पडलेल्या विविध जबाबदाऱ्यांविषयी माहिती सांगितली. अपघात, आजारपण या सर्वांवर मातकरून विद्यादानाचे काम करतानाचा उत्साह, वक्तशीरपणा, विद्यार्थ्यांप्रती असणारी आस्था, निवृत्तीनंतरही नवनवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती या त्यांच्या गोष्टी आत्मसात करणे म्हणजेच त्यांना श्रद्धांजली ठरेल. प्रा सुरेश माणगावकरयांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
या शोकसभेस गोगटे जोगळेकर वरिष्ठ तसेच अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.