gogate-college-autonomous-updated-logo

संस्कृत विभागात विशेष पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

gjc-sanskrit-department-vishesh-gunagaurav-march-22

प्रतिवर्षी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कालिदास स्मृति समारोह व्याख्यानमाला आयोजित केली जाते. त्यानिमित्ताने संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांना काही विशेष पारितोषिके दिली जातात. यावर्षी ही व्याख्यानमाला ऑनलाइन माध्यमातून घेण्यात आली. त्यामुळे त्यावेळी दिली जाणारी पारितोषिके एका विशेष गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करून देण्यात आली.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा मा. शिल्पाताई पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २५ मार्च २०२२ रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाच्या ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आपली ध्येय निश्चित करावीत आणि त्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. येणाऱ्या अनेक संकटांवर मात करत आपण प्रवास करत राहावा तेव्हा खात्रीने यशाचा मार्ग गाठता येतो. असे मा. शिलपाताईंनी आवर्जून सांगितले.

यावेळी अध्यक्षस्थानी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘गीर्वाणकौमुदी’ या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये संस्कृत विभागातील ३४ विद्यार्थ्यांनी संस्कृतशी संबंधित विविध विषयावर लेखन केले. त्यासाठी आर्या मुळे, कनक भिडे, सोनल ढोले, प्रियांका ढोकरे, ऐश्वर्या आचार्य यांनी संपादक मंडळ म्हणून काम पाहिले. त्यांचा प्रातिनिधिक गौरव मा. प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला. संपादक मंडळाच्या वतीने सोनल ढोले तर प्राध्यापकांच्या वतीने स्नेहा शिवलकर यांनी मनोगत व्यक्त केले आणि गीर्वाणकौमुदीचा प्रवास सर्वांसमोर उलगडला.

मा. प्राचार्यांच्या हस्ते संस्कृत विभागात विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. संस्कृतचे माजी विभागप्रमुख भालचंद्र नेने, ललिता घाटे, पूर्णिमा आपटे, रत्नागिरीतील विद्वान पं. दा. गो. जोशी यांच्या कुटुंबीयांनी तसेच संस्कृतचे हितचिंतक मुकुंद फडके यांनी संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांना देण्यासाठी काही पारितोषिके ठेवली आहेत. यावर्षी प्रथमवर्ष ते पदव्युत्तर विभागात संस्कृत विषयात सर्वप्रथम येऊन ही पारितोषिके प्राप्त करणारे विद्यार्थी अनुक्रमे पुढीलप्रमाणे:- प्रीती राजेंद्र टिकेकर, सोनल गोपाळ ढोले, प्रियांका योगेश ढोकरे आणि आशिष अनिल आठवले. तसेच अभ्यासाबरोबर अभ्यासेतर उपक्रमातील विशेष सहभागासाठी चैत्राली उदय लिमये आणि सुखदा हनुमंत ताटके यांना पं. दा. गो. जोशी पुरस्कार देण्यात आला. यावेळी १२ वी ला ९० पेक्षा अधिक गुण मिळवून प्रथम वर्षात संस्कृत विषय घेतलेल्या सिद्धी अरुण ओगले, आर्या संदीप मुळे, सायली नितीन ताडे, ओंकार रवींद्र खांडेकर, वरदा श्रीकांत बोंडाळे, केतकी शरद मुसळे, श्वेता सखाराम सावंत या मुलांचेही भेटवस्तू देऊन मा. प्राचार्यांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.

यावेळी मुंबई विद्यापीठात स्पृहणीय यश संपादन करून पदवी स्तरावर संस्कृत विषयाच्या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणारी नारायणी मिलिंद शहाणे आणि ऐश्वर्या विज्जल आचार्य यांनी विद्यापीठाकडून या क्रमांकांसाठी असणारे कीशीनचंद चेलाराम पारितोषिक प्राप्त केले. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले गेले. याबरोबरीने स्वरूप काणे आणि प्रियांका ढोकरे यांनाही गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता अधिकाधिक प्रयत्न करीत राहावेत म्हणजे आपल्याला यशाचा मार्ग सापडतो असे मा. प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अतिथींचा विशेष परिचय डॉ. कल्पना आठल्ये यांनी विद्यार्थ्यांना करून दिला. या कार्यक्रमासाठी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी तेजश्री जोशी, मृणाल बक्षी, प्रीती टिकेकर आणि कनक भिडे यांनी मंगलाचरणपर रामस्तोत्र सादर केले. त्यांना तबला साथ शिवम् करंबेळकर आणि संवादिनी साथ मनीष शेवडे यांनी केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आर्या केळकर हिने केले तर प्रा. जयंत अभ्यंकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments are closed.