महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे आणि नॅशनल फॅसिलिटी फॉर बायोफार्मास्युटीकल्स, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ ते ९ डिसेंबर २०२२ असे तीन दिवस अध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. डी.एन.ए. बारकोडिंग विज्ञान परिचित करून देणे हे या तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्दिष्ट असेल. ‘डी.एन.ए. बारकोड’ ही डी.एन.ए. क्रमामधील अशी अद्वितीय रचना आहे, की ज्यामुळे असंख्य जीवांमधून अपेक्षित सजीव ओळखता येणे सहज शक्य होते. व्याख्याने आणि प्रात्यक्षिके असे दुहेरी स्वरूप असलेल्या या कार्यशाळेमध्ये जैवविविधता, पर्यावरणशास्त्र, जैविक परीविक्षण, प्रजातींचे वर्गीकरण अशा जीवशास्त्राशी निगडीत विविध विषयांची संकल्पना आणि विश्लेषणात्मक बाजू डी.एन.ए.बारकोडिंगच्या माध्यमातून समजून घेतली जाईल.
या कार्यशाळेत कोकण विभागातील महाविद्यालये सहभागी होणार आहेत. सुमारे ४० अध्यापक आणि संशोधक विद्यार्थी यांनी सदर कार्यशाळेकरिता नोंदणी केली आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.