कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी अर्थात ‘कोमसाप’तर्फे महाविद्यालयीन लिहित्या विद्यार्थिनी करिता दिला जाणारा सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रद्धा हळदणकर हिला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला.
कोमसापकडून गेल्या २५ वर्षांपासून वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर क्षेत्रातील व्यक्तीना त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. यात कादंबरी, कथा, कविता, चरित्रपर, ललित, समीक्षा, वैचारिक, बालवाङ्मय आदी साहित्यप्रकारांतील उल्लेखनीय साहित्यकृतींद्वारे, तसेच वाङ्मयीन व्यवहार, पर्यावरण, शिक्षण आदी क्षेत्रांत कृतिशील योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रद्धा हळदणकर हिची महाविद्यालयीन लिहित्या विद्यार्थिनी करिता दिल्याजाणाऱ्या २०१८-१९ च्या सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कारासाठी प्रा. अशोक ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निवड केली होती.
कु. श्रद्धा हळदणकर हिने राज्यशास्त्र आणि मराठी या विषयातकला शाखेची पदवी संपादन केली असून, सध्या ती मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. सुरुवातीपासूनच तिला कथा, कविता, कादंबरी वाचन आणि कविता, लेख, निबंध लेखनाची आवड असून, आतापर्यंत तिने तालुका, जिल्हा, राज्य स्तरावरील विविधआंतरमहाविद्यालयीननिबंध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्राविण्य मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीश शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, महाविद्यालयातील शिक्षक, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर आदींनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या या सर्व वाटचालीत तिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र व मराठी विभागाचे प्रमुख, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.