gogate-college-autonomous-updated-logo

समकाळातील ऐरणीवर आलेल्या प्रश्नांचा अभ्यास करण्याची नितांत गरज – प्रा. डॉ. श्रुती तांबे

गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाच्याराष्ट्रीय चर्चासत्राचेउद्घाटन संपन्न

भारतात समाजशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात महाराष्ट्रात होऊन शतक उलटले असून, त्याचे जैविक मूल्यांकन होणे आवश्यक आहे. ज्या भूमीत समाजशास्त्र रुजले, त्याचे धागेदोरे जगातल्या इतर खंडातील अन्य भागात पसरले त्याचे शतकोत्तर कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दस्ताऐवजीकरणकरणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या समाजशास्त्रज्ञा प्रा. डॉ. श्रुती तांबे यांनी केले. र.ए. सोसायटीचे गोगटे – जोगळेकर महाविद्यालयआणि मराठी समाजशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारतीय समाज आणि विकास प्रक्रिया’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागआणि मराठी समाजशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमानेदि. ११ आणि दि. १२ एप्रिल, २०२२ रोजी‘भारतीय समाज आणि विकास प्रक्रिया’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात करण्यात आले आहे. याचे उद्घाटन प्रा. डॉ. श्रुती तांबे यांच्या हस्ते झाले. मराठी समाजशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आहे.

उपस्थितांना मागर्दर्शन करताना डॉ. तांबे पुढे म्हणाल्या, सामाजिक शास्त्रांच्या विकासात समाजशास्त्राचे मौलिक योगदान असून, त्याच्या प्रवासातील खाचखळगे, अडचणी तसेच भविष्यातील एक विषय म्हणून त्याच्या मार्गातील अडचणी, अंदाज यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे. जग वेगाने बदलत असताना समाजशास्त्राचे विश्व, त्यात अभ्यासले जाणारे वंचित घटकांचे विविध प्रश्न, अस्मिता आणि न्यायाचे राजकारणातील द्विधावस्थेचे प्रश्न अभ्यासताना त्याची महाराष्ट्रातील वास्तवाशी सांगड घालावी लागेल. समाजशास्त्रात सामाजिक चळवळीचा अभ्यास मध्यवर्ती मानून अभ्यासकांनी स्वत:ला परिवर्तनाशी जोडून घेतले पाहिजे. समकाळात अन्य विषयांबरोबरच लैंगिकतेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून, अभ्यासकांनी तो विसरता कामा नये. समाजशास्त्रातील सैद्धांतिक संकल्पनांचे आकलन करून इथल्या मातीशी नाळ असणाऱ्या, जुळनाऱ्या नवीन संकल्पनांची निर्मिती करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित अभ्यासकांना केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आणि पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या रोपट्याला पाणी घालून करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात प्रा. रोकडे यांनी समाजशास्त्र विभाग हा अत्यंत जुना शैक्षणिकअसून, नामवंत आणि सुप्रतिष्ठीत संशोधक-अभ्यासक, प्राध्यापक या विभागाला लाभले आहेत. अध्ययन अध्यापना बरोबच संशोधनाच्या क्षेत्रातही विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला असल्याचे सांगितले.

परिषदेच्या स्वागतपर मनोगतात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी संस्था-महाविद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोगा मांडून महाविद्यालयात सुरु असलेल्या विविध शैक्षणिक-सह शैक्षणिक उपक्रम, संशोधन याविषयी उपस्थितांना माहिती दिली.

याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ. पी.एस. पाटील यांनी परिषदेला शुभेच्छापर संदेश देताना सामाजिक शास्त्राच्या अभ्यासकांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा समाजावरील परिणामाचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

सोहळ्याला बीजभाषक डॉ. परमजीतसिंग जज (माजी अध्यक्ष, भारतीय समाजशास्त्र परिषद, नवी दिल्ली) यांनी आपल्या मनोगतातून समाजशास्त्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान, समाजशास्त्रातील बदलते प्रवाह, स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ आणि समकाळातील बदलते प्रवाह याविषयी विविध पैलू उपस्थितांना उलगडून दाखवले.

याप्रसंगी मराठी समाजशास्त्र परिषदेच्या वतीने समाजशास्त्राच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या अभ्यासकांचा मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात सन २०१२, २०२०, २०२१ चे जीवनगौरव पुरस्कार अनुक्रमे डॉ. बी. एल जोशी, प्रा. डॉ. एस. एल. गायकवाड (औरंगाबाद), प्रा. डॉ. प्रदीप आगलावे (नागपूर), प्रा. रमेश जाधव (कोल्हापूर), प्रा.डॉ. रमेश कांबळे (मुंबई) यांना प्रदान करण्यात आले. तर र. ए. संस्था आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या वतीने प्रा. एस. एन. पवार यांना कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणूनडॉ. प्रदीप आगलावे (सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समिती, महाराष्ट्र राज्य, मुंबई), प्रा. डॉ. बालाजी केंद्रे (विभागप्रमुख, समाजशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई), प्रा. नारायण कांबळे (अध्यक्ष, मराठी समाजशास्त्र परिषद),र. ए. सोसायटीचे सचिव श्री. सतीश शेवडे, मराठी समाजशास्त्र परिषदेचे कार्यकारिणी सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. सतीश शेवडे म्हणाले, समाजशास्त्र हा महाविद्यालयातील जुना शैक्षणिक विभाग असून, समाजशास्त्र विषयावरील हे राष्ट्रीय चर्चासत्र कोकणातील आमच्या महाविद्यालयात संपन्न होणे ही रत्नागिरी शिक्षण संस्थेसाठी आनंदाची गोष्ट असून, भविष्यात संस्था अशा उपक्रमांना पूर्णपणे सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांना दिली.

या समारंभाला डॉ. मिलिंद बोकील,मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. पी. जी. जोगदंड, भारतीय समाजशास्त्र परिषदेचे सचिव प्रा. डॉ. जगन कराडे, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक, संशोधक-विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आनंद आंबेकर यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. सचिन सनगरे यांनी केले.

Comments are closed.