रामटेकच्या कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे अध्ययन केंद्र या नामकरण सोहळ्यात तन्मय हर्डीकर याला युवा संस्कृत विद्वान पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. याबद्दल गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात छोटेखानी कार्यक्रमात दि. ०३ मार्च २०२२ रोजी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तन्मयचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तन्मय हा आडिवरे गावचा रहिवासी असून लहानपणापासून संस्कृतची आवड असल्याने त्याने दहावीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिरवणे गुरुजींच्या पाठशाळेत पारंपरिक संस्कृत शिक्षण घेतले. तेथे पौरोहित्याचे शिक्षणही घेतले. नंतर त्याने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत विषयासाठी प्रवेश घेतला. संस्कृत घेऊन त्याने २०१७ मध्ये बीए पदवी उत्कृष्ट गुणांकनाने संपादन केली. महाविद्यालयात तीन वर्षे त्यांनी संस्कृत विषयक विविधांगी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. संस्कृत प्रदर्शनात यज्ञ सामग्री यावर त्याच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात प्रदर्शन भरवले होते. संशोधनात्मक कामाकडेही त्याचा कल होता. गीर्वाणकौमुदी या विभागाच्या भित्तिपत्रकाच्या संपादन मंडळात त्याने उल्लेखनीय सहभाग दर्शविला आहे. संस्कृत भाषेवर त्याने मनापासून प्रेम केले व त्यावर महाविद्यालयीन काळात प्रभुत्वही मिळवले. त्याने नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संस्कृत संस्थान आयोजित शास्त्रीय स्फूर्ती स्पर्धेत राज्य स्तरावर यश मिळवले. त्यानंतर त्याची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली आणि आगरतळा, त्रिपुरा येथे पुढील स्पर्धेत त्याने सहभाग घेतला होता. तन्मयच्या सत्काराप्रसंगी संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा. स्नेहा शिवलकर, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, स्नेहल हर्डीकर, मयुरेश जायदे आदी उपस्थित होते.