गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १२ मार्च २०२२ रोजी संस्कृत विभागाच्या वतीने वैदिक गणित कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. राजीव सप्रे यांनी वैदिक गणित हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून अनेक ठिकाणी मी कार्यशाळा घेत आहे, असे आवर्जून नमूद केले. यावेळी वैदिक गणिताचा वापर केला तर खूप कठीण वाटणारा गणितासारखा विषय आपल्याला सोपा होऊ शकतो आणि कोणतेही आणि कितीही मोठे गणित आपण याद्वारे पटकन सोडवू शकतो, यादृष्टीने याचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत वैदिक गणितातील काही सूत्रे त्यांनी विशद केली. उपस्थित विद्यार्थ्यांकडून काही प्रात्यक्षिक स्वरूपात वैदिक सूत्रांचा वापर करून गणिते सोडवून घेतली. विद्यार्थ्यांनीही अतिशय रंजक आणि रोचक पद्धतीने या कार्यशाळेचा अनुभव घेतला. अनेक कठीण वाटणारी गणितेही पटकन सोडविता येतात, याची विद्यार्थ्यांना माहिती झाली. एकंदर ३६ विद्यार्थी या कार्यशाळेला उपस्थित होते.
प्रास्ताविकात संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी वैदिक गणित कार्यशाळेच्या आयोजनामागील हेतू विशद केला. तसेच डॉ. राजीव सप्रे यांचा परिचय करून देताना त्यांचा गणिताबद्दलचा ओढा, आवड आणि उत्तम संशोधनात्मक दृष्टी, चांगला मार्गदर्शक असे त्यांचे काही विशेष सर्व विद्यार्थ्यांना सांगितले.
या संपूर्ण कार्यशाळेचे सूत्रसंचालन संस्कृत विभागातील प्रा.स्नेहा शिवलकर यांनी केले.