गोगटे जोगळेकर महाविद्यालयात २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी २८ फेब्रुवारीला ‘रामन इफेक्ट’ या नोबेल पुरस्कारप्राप्त शोधाला गौरवण्यासाठी देशभरात विज्ञान दिन साजरा केला जातो. यंदा भारतीय स्वातंत्र्याला पूर्ण होणारी ७५ वर्षे म्हणजेच ‘आझादी का अम्रित महोत्सव’ हे विशेष औचित्य असल्याने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची ७५ वर्षातील वाटचाल आणि शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान यांचा एकत्रित वापर या संकल्पनेवर विज्ञान दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात विज्ञान सप्ताह साजरा केला. यामध्ये विज्ञान मंडळातर्फे दि. २३ फेब्रुवारी रोजी ‘पाणीसंवर्धन’ विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यात १३८ विद्यार्थी सहभागी झाले होते. निसर्गमंडळातर्फे दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘पाण्याखालील जीवन’ याविषयावर भित्तीपत्रक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ९ विद्यार्थ्यांनी आपली भित्तीपत्रके सादर केली. खगोल अभ्यासकेंद्रातर्फे राष्ट्रीय सौर दिनदर्शिका याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याला पूर्ण होणारी ७५ वर्षे साजरी करण्याच्या निमित्ताने राष्ट्रीय प्रतीकांविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून राष्ट्रीय सौर दिनदर्शिका हा विषय निवडण्यात आला होता. दि. २८ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यी मंडळातर्फे ‘मुक्तदिन’ (ओपनडे) साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील शास्त्र शाखेतील १० विविध विभागांच्या प्रयोगशाळा सर्वांसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. प्रयोगशाळेत विषयांशी निगडीत विविध प्रात्यक्षिके आणि उपकरणे मांडण्यात आली होती. याप्रदर्शनास शालेय विद्यार्थी, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, शहरातील नागरिक यांनी भेट दिली.
विज्ञानदिनाचे औचित्यसाधून मान. श्री. दिपक गद्रे, संस्थापक, गद्रेमरीन एक्सपोर्ट आणि गद्रे इन्फोटेक; मान. श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्याध्य आर. ए. सोसायटी; प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी; शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत राधाबाईशेट्ये सभागृहात विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध स्पर्धातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी श्री. दिपक गद्रे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन ‘कल्पनाशक्ती प्रत्यक्षात उतरवण्याकरीता विज्ञानाचा उपयोग करा’ असा संदेश दिला. तर श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना ‘ज्ञानाला विज्ञानाची जोड द्या’ असा संदेश दिला.
प्राचार्यांनी विज्ञान सप्ताह आणि विज्ञान दिनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच यापुढे विद्यार्थी आणि शिक्षकांचे संशोधनकार्य अधिक नेमक्या पद्धतीने सर्वांसमोर आणण्यासाठी प्रयत्नशील राहू या असेही मत व्यक्त केले.
विज्ञान दिनाच्या संध्येला महाविद्यालयाच्या खगोल अभ्यासकेंद्राकडून आकाश निरिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ८० खगोलप्रेमी मंडळींनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी महाविद्यालयाचे आजी- माजी विद्यार्थी, शालेय विद्यार्थी तसेच शहरातील उत्साही नागरिक उपस्थित होते.
विज्ञान सप्ताह आणि विज्ञान दिन या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आयोजन विद्यार्थी मंडळाने केले होते. यासाठी त्यांना शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, भौतिकशास्त्र विभागातील डॉ. विवेक भिडे यांचे मार्गदर्शन तर विविध विभागातील प्राध्यापक आणि कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.