gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

भारतीय वैज्ञानिक सर चंद्रशेखर वेंकटरमण यांना ‘रामन इफेक्ट’च्या संशोधनाकरिता सन १९३० मध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. विज्ञान विषयात नोबेल पुरस्कार प्राप्त झालेले ते प्रथम भारतीय शास्त्रज्ञ होते. त्याप्रित्यर्थ सन १९८६ पासून भारतामध्ये प्रतिवर्षी दि. २८ फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा केला जातो. यावर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामुळे सदर कार्यक्रमाला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शास्त्र शाखेतर्फे दरवर्षी या दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शन तसेच विविध उपक्रम करण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मान. श्री. दीपक गद्रे, संस्थापक, गद्रे मरीन्स व गद्रे इन्फोटेक हे उपस्थित राहणार आहेत.

महाविद्यालयाच्या शास्त्र शाखेतर्फे सोमवार दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी महाविद्यालयात ‘मुक्त दिवस’ (ओपन डे चे) आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनांमधून शास्त्रीय संशोधनासाठी वापरली जाणारी उपकरणे व प्रात्याक्षिके दाखविली जाणार आहेत. शालेय विद्यार्थी व समाज यांच्यामध्ये विज्ञानाविषयी जागृती व कुतूहल निर्माण व्हावे या हेतूने सदर प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच महाविद्यालयातील खगोल अभ्यास मंडळातर्फे सायंकाळी ७ ते ८ या वेळेत महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर ‘आकाश निरीक्षण’ या कार्यक्रमाचे सर्वांसाठी आयोजन करण्यात आले आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी अधिकाधिक शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना या कार्यक्रमांना लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Comments are closed.