गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळाच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्यसाधून ‘स्वातंत्र्योत्तर भारतातील विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती’ या विषयावरील भित्तीपत्रकाचे दि. १५ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले. सदर भित्तीपत्रकाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, शास्त्र शाखेच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
सदर भित्तीपत्रकाकरिता विद्यार्थ्यांनी गेल्या ७५ वर्षांतील भारताचे अवकाश संशोधन, गणित विषयातील योगदान, औषध निर्माणशास्त्र, जीवरसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र अशा विविध विषयातील भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रगतीचा आढावा घेणारे लेख सादर केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी ‘विज्ञानातील प्रगतीचे भारतीय विकासातील योगदान’ यावर आपले विचार मांडले तर उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी विद्यार्थी व आयोजकांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे नियोजन विज्ञान मंडळाचे सदस्य डॉ. वर्षा घड्याळे, प्रा. ऋजुता गोडबोले, प्रा. वनश्री तांबे, प्रा. निशा केळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऋजुता गोडबोले यांनी केले.