जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बायोलॉजिकल सायन्सेस विभागातर्फे दि. ०६ फेब्रुवारी २०१८ रोजी ‘कर्करोग जागरूकता दिनाचे’ आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कर्करोगाचे गांभीर्य, त्याचे होणारे दुष्परिणाम व त्यावर मात करण्यासाठी भारतीय योगपद्धतीचे महत्व अधोरेखित करण्यासाठी एका व्याख्यानपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून योगतज्ज्ञ श्री. श्रीकांत ढालकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. योगाच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले व त्या क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेले असे बहुआयामी व बहुव्यासंगी व्यक्तिमत्व वक्ते म्हणून लाभल्याने उपस्थितांनी व्याख्यानाचा व योग प्रात्यक्षिकांचा पुरेपूर आस्वाद घेतला याप्रसंगी योगशिक्षक श्री श्रीकांत ढालकर यांनी जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन उपस्थितांना दिला. रोजच्या जीवनात घडणार्या छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंदाचा आस्वाद सर्वकाही सहजसाध्य आहे. आपले मन खंबीर असेल तर आपण स्वतःला कॅन्सरपासून दूर ठेवू शकतो, इतकेच नव्हे तर कॅन्सरग्रस्ताना नैत्तिक बळ देण्याचे सामर्थ्य आपल्याठायी निर्माण होते असे ते म्हणाले. आजच्या धकाधुकीच्या व धावपळीच्या जीवनात योगासने व प्राणायामाचे महत्व त्यांचेकडून समजावून घेताना सर्व उपस्थित विद्यार्थीवर्ग व शिक्षकवृंद तल्लीन झाला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विज्ञान विभागाचे उपप्राचार्य श्री. डॉ. मिलिंद गोरे यांनी भूषविले. याप्रसंगी विभागाचे प्रमुख व महाविद्यालाचे प्रशासकीय उपप्राचार्य श्री. डॉ. अरविंद कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली.
सदर कार्यक्रम हा दोन सत्रात घेण्यात आला. दुपारच्या सत्रात कर्करोग जागरूकता हा विषय केंद्रस्थानी पकडून विद्यार्थांमध्ये असलेले सुप्त कलागुण हेरून त्यांना वाव देण्यासाठी एका छोटेखानी लघुनाटिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विज्ञान शाखेतील विविध वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने सहभाग नोंदविला सदर कार्यक्रमाची थीम ‘हेल्थ इज वेल्थ’ अर्थात ‘आरोग्यम धनसंपदा’ अशी निश्चित करण्यात आली होती.
यामाध्यमातून आपापल्या नाटिकांमधून विद्यार्थांनी कर्करोग, एड्स इत्यादी रोगांविषयी जागरूकता व त्यावर उपाययोजना ह्यावर भाष्य केले. सदर कार्यक्रमास रमेश कीर कला अकादमीचे प्रमुख श्री. प्रदीप शिवगण व महाविद्यालाचे प्राध्यापक व नाट्यशास्त्राचा गाढा अनुभव असलेले प्रा. श्री महेश नाईक हे परीक्षक म्हणून लाभले.
कार्यक्रमाच्या अखेरीस सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी मत्समहाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. शेखर कोवळे यांची उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात पार पडला.
बहुसंख्य विद्यार्थांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विभागाचे प्रमुख व महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच विभागातील सर्व प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.