दि. २ फेब्रुवारीच्या जागतिक पाणथळ दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालय, कांदळवन कक्ष आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ज. शं. केळकर सभागृहामध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी माननीय जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी तहसिलदार शशिकांत जाधव, तहसीलदार (महसूल) तेजस्विनी पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्राणीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. मधुरा मुकादम तसेच जीवरसायनशास्त्राच्या विभाग प्रमुख डॉ. वर्षा घड्याळे व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या मनोगताने झाली. त्यामध्ये त्यांनी ‘पाणथळ जागा म्हणजे काय आणि मानवी जीवनामध्ये त्यांचे असलेले महत्त्व व त्यापासून उपलब्ध होणाऱ्या व्यवसायाच्या संधी’ यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी युवकांच्या सक्रिय सहभागाची गरज आहे असे नमुद केले.
या कार्यक्रमामध्ये चार व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या मधील पहिले व्याख्यान हे ‘पाणथळ परिस्थितीकी’ या विषयावर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक श्री शरद आपटे यांचे झाले. त्यानंतर सह्याद्री निसर्ग मित्र मंडळाचे श्री. मोहन उपाध्ये यांनी ‘कासव संवर्धन मोहिमेतील त्यांचा रोचक प्रवास’ उलगडून दाखवला. त्याच बरोबर वनविभाग कांदळवन कक्षाच्या श्रीम. प्रांजली चोप्रा व श्री. स्वस्तिक गावडे यांनी ‘पाणथळ जागा आणि तेथील कांदळवनांची उपयुक्तता व त्यांना असणारे धोके’ विशद केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राणीशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय व कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल श्री. राजेंद्र पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सिंहाचा वाटा होता.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोहिनी बामणे आणि आभार प्रदर्शन श्री. राजेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू प्रा. अंबादास रोडगे यांनी सांभाळली.