भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरीतील शाळांमध्ये जाऊन राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामुहिक वाचन केले.
शालेय विद्यार्थांमध्ये भारतीय संविधानातील आणि लोकशाहीची मुल्ये रुजावी, विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्व समजावे, संविधानाच्या उद्दिष्टांची ओळख व्हावी, संविधानाप्रती आदर व निष्ठा निर्माण होऊन राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्यांनी आपली भूमिका बजावावी असे प्रमुख हेतू समोर ठेऊन राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन संविधानविषयक माहिती दिली तसेच राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामुहिक वाचन करून घेतले. ११ शाळांतील सुमारे ५७४ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले.
या उपक्रमाला उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांचे सहकार्य तर प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमाचे नियोजन प्रा. निलेश पाटील यांनी केले. गेली दोन वर्षे विभाग हा उपक्रम आयोजित करत असून सदर उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे मत अनेक शाळांच्या मुख्याध्यापिकांनी व्यक्त केले.