रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या र. प. कला व विज्ञान आणि र. वी. जोगळेकर विज्ञान महाविद्यालयाचे आद्य देणगीदार कै. नारायण रघुनाथ गोगटे यांचा स्मृतिदिनपर कार्यक्रम महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला.
प्रतिवर्षी दि. ८ जुलै हा दिवस महाविद्यालयाचे आद्य देणगीदार कै. नारायण रघुनाथ गोगटे यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले, ‘१९४५ मध्ये स्थापन झालेल्या महाविद्यालयाच्या उभारणीत कै. नारायण रघुनाथ गोगटे यांचा मोलाचा वाटा आहे. संस्थेचे संस्थापक कै. बाबुराव जोशी यांच्या विनंतीला मान देऊन शैक्षणिक कार्याला मदत करण्याची उदार मानसिकता कै. गोगटे यांनी त्याकाळी दाखवली. पुढे या महाविद्यालयाला त्यांचे वडील रघुनाथ परशुराम गोगटे यांचे नाव देण्यात आले.’ यानंतर प्राचार्य डॉ. सुखटणकर यांनी कै. गोगटे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून महाविद्यालयाने ठरविलेल्या ध्येय-उद्दिष्टांनुसार विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून अध्ययन-अध्यापन करावे, असे नमूद केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले.