गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे स्नेह संमेलन ‘झेप’ला आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरवात झाली. पारंपारिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी ढोलपथकाच्या गजरात नटराजाची पालखी आणि मानाचा महाराजा करंडक घेऊन शोभायात्रा काढली. सदर शोभायात्रा खातू नाट्यमंदिर येथे विसर्जित झाली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहोळा संपन्न झाला.
‘क्षमता संवर्धन’ या संकल्पनेवर आधारित झेप या सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, प्रा. आनंद आंबेकर, विद्यार्थी प्रतिनिधी तन्मय सावंत उपस्थित होते. नटराज पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.
श्री. सतीशजी शेवडे यांनी महाविद्यालयाचा एक माजी विद्यार्थी या नात्याने उपस्थित असल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागात काम केल्याने नेतृत्वगुण विकसित झाल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणाऱ्या आणि नेतृत्व गुणांचा विकास करणाऱ्या झेपच्या नेटक्या संयोजनासाठी त्यांनी प्राचार्यांचे अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ‘क्षमता संवर्धन’ ही संकल्पना विषद केली. कार्यक्रमाच्या आखणी पासून ते कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्याच्या मूल्यमापानापर्यंत प्रेत्येक गोष्टीचे नियोजन करण्यात आले असून यासाठी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे प्रशिक्षण घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
तीन दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवादरम्यान विविध प्रदर्शने, स्टोल्स, फनी गेम्स याबरोबरच विविध प्रकारचे ७५ कलाप्रकार सादर होणार आहेत.