गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे नुकताच जागतिक मृदा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामिनित्त कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी ‘मृदा एक अमूल्य नैसर्गिक संसाधन’ या विषयावरील भित्तीपत्रक तयार केले; याचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य आणि रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मिलिंद गोरे, विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे श्रद्धा पर्शुराम मृदा परीक्षण प्रयोगशाळा चालविण्यात येते. सदर प्रयोगशाळा शासनमान्य असून परिसरातील शेतकऱ्यांच्या मृदा नमुन्यांची चाचणी या प्रयोगशाळेत करण्यात येते. जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने मृदा या महत्वाच्या नैसर्गिक घटकाबद्दल जनजागृती करण्याच्या हेतूने डॉ. कद्रेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. डॉ. कद्रेकर यांनी कोकणातील मातीची विभागवार संरचना, कोणत्या पिकासाठी माती उपयुक्त आहे, कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्या यासंदर्भात विशेष मार्गदर्शन केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी मृदा प्रयोगशाळा सुरु झाल्यापासून ६५० मृदा नमुन्यांची यशस्वीरित्या चाचणी केल्याबद्दल रसायनशास्त्र विभागाचे अभिनंदन केले. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हिताचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना मृदा परीक्षणाची कौशल्ये देण्यासाठी देखील उपयुक्त आहे; असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मृदा या महत्वाच्या नैसर्गिक संसाधनाची काळजी घेण्याची ‘जागतिक मृदा दिन प्रतिज्ञा’ उपस्थितांनी घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. मिलिंद गोरे यांनी विद्यार्थ्यांना मृदा परीक्षण कौशल्ये शिकविण्यासाठी विभागातर्फे ‘सॉईल अॅनालिसिस सर्टिफिकेट कोर्स’ सुरु करणार असल्याचे जाहीर केले. मृदा परीक्षण प्रयोगशाळेत प्रत्यक्ष काम करणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.