गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी ग्रंथालय हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक अग्रगण्य आणि समृद्ध असे ग्रंथालय आहे. ग्रंथालयाची स्थापना महाविद्यालायाबरोबरच म्हणजे १९४५ यावर्षी झाली. ग्रंथालयात ग्रंथ देव-घेव कक्ष, अभ्यासिका कक्ष, संदर्भ ग्रंथ दालन, दुर्मिळ ग्रंथ दालन, नियतकालिक कक्ष, स्पर्धा परीक्षा आणि नेट-सेट परीक्षा कक्ष, पदव्युत्तर विभाग स्वतंत्र कक्ष, मोफत इंटरनेट सुविधा तसेच पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचा ग्रंथ निवडण्यासाठी ‘मुक्तद्वार पद्धती’ अशा विविध सेवा-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. ग्रंथालय पूर्णत: संगणकीकृत असून बारकोडद्वारे पुस्तक देव-घेव केली जाते. ‘वेब ओपॅक’ ची उपलब्धी हे आणखी एक या ग्रंथालयाचे वैशिष्टय आहे. सद्य:स्थितीत ग्रंथालयाची एकूण ग्रंथ संख्या १,०६,६५५ असून २१ दैनिके तसेच १४२ नियतकालिके नियमित येत असतात. तर सुमारे ६००० ई नियतकालिके आणि १,३५,००० पेक्षा अधिक ईबुक्स उपलब्ध आहेत. दृक्श्राव्य माध्यमे ८२५ असून शोधनिबंबंधांची संख्या ६२ आहे; तसेच ग्रंथालयाकडे २७७ दुर्मिळ पुस्तके आणि ७८ दुर्मिळ हस्तलिखितांचा खजिना उपलब्ध आहे. या ग्रंथालयाची प्रशस्त आणि हवेशीर अभ्यासिका ही विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनास प्रेरित करणारी सुंदर अशी जागा आहे.
ग्रंथालयात नियमितपणे आणि विशेष दिवसांचे औचित्य साधून ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह ‘ग्रंथप्रदर्शन’द्वारे वाचकांना खुला करून दिला जातो. सहकार भित्तीपत्रक प्रकाशनप्रसंगी आवर्जून त्या-त्या भित्तीपत्रकाच्या विषयानुसार ग्रंथ प्रदर्शने आयोजित केली जातात.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अधिक आणि सकस वाचनाकरिता प्रवृत्त करणारे आणि विद्यार्थीभिमुख असे ग्रंथालयाचे अनेक उपक्रम आहेत. यामद्धे नवीन आकर्षणे असलेला कक्ष, नव्याने दाखल झालेल्या ग्रंथांची ‘ग्रंथयादी’ नवीन आकर्षणे येथे प्रदर्शित करणे, विद्यापीठ प्रश्नसंच तयार करणे, महाविद्यालयाशी सलग्न प्रसारमाध्यमातील बातम्या संकलन करणे, विविध१७ विभागांची ‘विभागीय ग्रंथालये’ असून या विभागांना सुमारे १८२५ ग्रंथ देण्यात आले आहेत, दिवाळी अंक प्रदर्शन अशाप्रकारच्या सेवा-सुविधांचा यामद्धे समावेश आहे.
याशिवाय मागासवर्गीय विद्यार्थी विद्यापीठ पुस्तक पेढी योजना, हुशार आणि गरजू विद्यार्थी पुस्तक पेढी योजना, कमवा शिका योजना, बहिस्थ विद्यार्थी ग्रंथालय सुविधा, विद्यार्थी ‘वाचक गट’ उपक्रम, आदर्श विद्यार्थी वाचक आणि आदर्श शिक्षक वाचक पुरस्कार, रात्र पुस्तक देव-घेव योजना, २०% सवलत पुस्तक पेढी योजना असे विद्यार्थीप्रिय ग्रंथालय उपक्रम आहेत. आगामी काळात लवकरच कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी ग्रंथालयाला आर.एफ.आय.डी. या अत्याधुनिक ग्रंथालय स्वयंचलित प्रणालीची जोड देण्यात येणार आहे.
अशा या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात दि. २३ व २४ फेब्रुवारी २०१८ रोजी संपन्न होणाऱ्या ‘ओपन सोर्स सॉफ्टवेअर’ या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या निमित्ताने राज्यातील महाविद्यालयीन ग्रंथपाल आणि कर्मचारी, सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथपाल आणि कर्मचारी तसेच ग्रंथालय शास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांना या कार्यशाळेकरिता निमंत्रित करण्यात येत आहे. सदर कार्यशाळेला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या ग्रंथपाल डॉ. सुनिता बर्वे; गोखले इन्स्टिट्यूट, पुणे येथील ग्रंथपाल डॉ. नानाजी शेवाळे; ग्रंथपाल डॉ. नंदकुमार मोतेवार आणि ग्रंथपाल श्री. सुधीर मोरे इ. मार्गदर्शन करणार आहेत.
यापूर्वीही महाविद्यालयीन ग्रंथालयाने २०१० या वर्षी पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सहयोगाने ‘हस्तलिखित कार्यशाळे’चे यशस्वीरित्या आयोजन केले आहे.