गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे कै. बाबुराव जोशी ग्रंथालय आणि राजाराममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन, कलकत्ता (भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘राज्यस्तरीय कार्यशाळेचे’ उद्घाटन दि. २३ फेब्रुवारी २०१८ रोजी राधाबाई शेट्ये सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी व्यासपीठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे सहाय्यक ग्रंथपाल श्री. भावेश पटेल, गुहागर येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. नंदकुमार मोतेवार, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन आणि प्र. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे उपस्थित होते. याप्रसंगी प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाची वैशिष्ट्ये आणि ग्रंथालयामार्फत चालवले जाणारे विविध उपक्रम आणि सेवा-सुविधा यांची सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुणे आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या श्री. भावेश पटेल यांनी महाविद्यालयातील आपल्या आठवणींना उजाळा दिला. ऑनलाईन अभ्यासक्रम आणि ग्रंथालये, ओपन सोअ र्सचे तंत्रज्ञान तसेच विद्यार्थी कौशल्य विकास याविषयी त्यांनी आपली मते मांडली. या प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी आपल्याला वाचनाची आवड कशी लागली व आपण पुढे ती कशी जोपासली हे सांगितले. वाचनातून माणूस घडतो, जीवनकौशल्ये मिळवतो तसेच त्यातून तणावव्यवस्थापन साध्य करू शकतो असे मत त्यांनी मांडले. विद्यार्थ्यांना त्यांनी वाचनाचा मूळ उद्देश कायम ठेवावा व जीवन घडवण्यासाठी त्याचा वापर करावा असे आवाहन केले आणि ग्रंथालयाने आयोजित लेलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेला शुभेच्छा व्यक्त केल्या. ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन यांनी या कार्यशाळेच्या नियोजनासंबंधी सविस्तर माहिती दिली व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. दोन दिवसीय कार्यशाळेकरिता राज्यातील महाविद्यालयीन आणि सार्वजनिक ग्रंथालयांतील ग्रंथपाल, कर्मचारी आणि ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते.
पहिल्या सत्रात डॉ. नंदकुमार मोतेवार यांनी ‘रेक्ट्रोस्पेक्टीव्ह कन्वर्जन’ या विषयावर मार्गदर्शन केले. ग्रंथालयाचे संगणकीकर करताना हाती घ्यावयाचे टप्पे त्यांनी विषद केले. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात एन.सी.एल., पुणे येथील वरिष्ठ तांत्रिक अधिकारी डॉ. सुनिता बर्वे यांनी ‘कोहा’ या ओपन सोअर्स प्रणालीविषयी दोन्ही सत्रांमध्ये सहभागींना प्रात्यक्षिकांसह चर्चात्मक मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात डीबीजे महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. सुधीर मोरे यांनी ‘डाटा कन्वर्जन इन मार्क अॅड इम्पोर्ट इन कोहा’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पोलीटीक्स अॅड इकोनॉमिक्सचे ग्रंथपाल डॉ. नानाजी शेवाळे यांनी ‘डीस्पेस’ या ओपन सोअर्स प्रणालीविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. आपल्या ग्रंथालयातील माहिती आणि वाचन साहित्य प्रत्येक ग्रंथपाल ऑनलाइन ठेऊ शकतो; याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
यानंतर ग्रंथालयाच्या हॉलमद्धे संपन्न झालेल्या समारोप समारंभाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक श्री. किरण धांडोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन यांनी केले. यात त्यांनी कार्यशाळेचा आढावा घेतला.
श्री. किरण धांडोरे यांनी पारंपारिक आणि बदलत्या ग्रंथालयाच्या भूमिकेविषयी बोलताना आपण येणाऱ्या काळासाठी सक्षम असले पाहिजे. ग्रंथालय आणि माहिती तंत्रज्ञान यातील बदल योग्यवेळी जाणून घेतल्यास आपण आपले काम योग्य गतीने करू शकतो. यावेळी त्यांनी शासनाची सध्याची ग्रंथालयविषयक ध्येय-धोरणे विषद केली.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी ग्रंथालय आणि ग्रंथपाल यांची बदलती भूमिका आणि ग्रंथालयीन सेवा-सुविधा यांचा आढावा घेतला. बदलत्या काळात ग्रंथालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांकरिता ही कार्यशाळा अधिक उपयुक्त तसेच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
उद्घाटन आणि समारोप समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. कार्यशाळेत सहभागींना प्रमाणपत्र वितरणानंतर या कार्यशाळेची सांगता झाली.