gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिले मराठी विकिपीडियासाठी योगदान – राज्य मराठी विकास संस्था आणि मराठी विभागाच्या वतीने कार्यशाळा उत्साहात

marathi-dept-workshop

राज्य मराठी विकास संस्था आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया विषयक राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या संगणक कक्षात दि. १० जानेवारी २०१७ रोजी घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विकिपीडिया या डिजीटल ज्ञानकोशाचा परिचय करून घेतला. तसेच त्यात संपादनही केले.

आंतरजालावर माहितीचा प्रमुख स्त्रोत म्हणून विकिपीडियाची ओळख आहे. संगणक आणि इंटरनेट यांच्या सहाय्याने समृद्ध होत असलेली युवा पिढी आपली बौद्धिक गरज भागवण्यासाठी आज विकिपीडियाचा आधार घेताना दिसते. उपयुक्त सदर्भ आणि विश्वासार्ह माहिती म्हणजे विकिपीडिया असे समीकरणच आता रूढ होऊ लागले आहे. आज विकिपीडियावरील ज्ञानकोश पाहता इंग्रजीतून विविध विषयांचे सुमारे ५० लाख दुवे उपलब्ध आहेत. मात्र मराठी विकिपीडियावरील दुव्यांची संख्या केवळ ५० हजार इतकी आहे. त्यामुळे मराठी विकिपीडिया अधिक समृद्ध व्हावा, त्यायोगे मराठी अभ्यासकांना त्याचा अधिकाधिक वापर करता यावा,विद्यार्थ्यांच्या नैपुण्याचा विकास साधावा या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, मराठी विभागप्रमुख शिवराज गोपाळे, साधनव्यक्ती म्हणून डॉ. आर्या जोशी, महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव तन्मय सावंत आदी उपस्थित होते.

या उपक्रमात महाविद्यालयाच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यशाळेअंतर्गत डॉ. जोशी यांनी विकिपीडियाच्या उपयोजिततेबाबत आणि त्यावरील संपादनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी स्वतः विकिपीडियावर विविध विषयांवर लेखन करून आंतरजाल समृद्ध केले. याप्रसंगी अमेरिकास्थित मराठी विकिपीडियाचे प्रचारक अभय नातू यांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जागतिक पातळीवर मराठीचे स्थान उंचावण्यासाठी युवा पिढीने मराठी विकिपीडियावर रोज किमान ५ संपादने करण्याचे आवाहन केले. तसेच हा अभिनव उपक्रम राबविल्याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठी विभागातर्फे डॉ. निधी पटवर्धन, प्रा. सायली पिलणकर, संगणकशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्रा. अनुजा घारपुरे व त्यांचे सहकारी, तांत्रिक सहाय्यक श्री. राजपूत यांचे सहकार्य लाभले.

Comments are closed.