पर्यावरण संस्था, रत्नागिरी आणि वनस्पतीशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने फणसोप सडा या ठिकाणी नुकतेच ‘नेचर वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. कोकणातील पठारे (सडा) सध्या तेथील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आणि फुलांनी सजलेला आहे. त्याबद्दलची वैज्ञानिक माहिती विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना व्हावी या प्रमुख उद्देशाने आणि ज्यामुळे नैसर्गिक विविधता टिकविण्याची गरज सर्वांच्या लक्षात येईल.
प्रारंभी पर्यावरण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी पठारांची निर्मिती, संरचना आणि प्रकार याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रा. शरद आपटे यांनी पठारांवर वाढणाऱ्या वनस्पतींना कमी प्रमाणात मिळणारे पोषणमूल्य व अशाही परिस्थितीत पावसाळ्याच्या हंगामात निर्माण होणारी रानफुले याबद्दल विस्तृत अशी माहिती दिली.
उपस्थितांना युट्रीक्यूलारीया, ड्रोसेरा यासारख्या किटकभक्षी वनस्पती; रॅकिकारफा, अॅनॉटीस, अॅनेलीना, एक्जेमम, इरीओकोलॉन इ. रंगीबेरंगी फुले असणाऱ्या वनस्पती तसेच सायपेरस, स्कीरपस आणि गवतांच्या इतर प्रकारांबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली.
या निसर्गभ्रमणाकरिता पर्यावरण संस्था, रत्नागिरीचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर, सचिव डॉ. दिलीप सावंत, डॉ. दिलीप नागवेकर, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन, महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.