gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत अनुभव कथन कार्यक्रमाचे आयोजन

येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व वनवासी कल्याण आश्रम, कोंकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सेवांसंदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी आणि सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने दि. २२ सप्टेंबर रोजी ‘अनुभव कथन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या ज. शं. केळकर सेमिनार हॉल मध्ये हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सामाजिक कार्यकर्त्या विश्वेषा मुळ्ये यांनी अरुणाचल प्रदेश येथील वनवासी कल्याण आश्रमातील आपल्या कार्याबाबतचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. अरुणाचल प्रदेशमधील लोकजीवन, संस्कृती, भाषा, राहणीमान, शिक्षण, खाद्यसंस्कृती, तेथील मुलांना शिकवताना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी अध्यक्षीय मनोगतात विश्वेषा मुळ्ये यांच्या सामाजिक कार्यामधील योगदानाबाबत कौतुक केले तसेच असा आदर्श घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी असलेल्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनीही सामाजिक कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. शिवाजी उकरंडे यांनी केले तर एन.एस.एस. स्वयंसेवक कु. तैबा बोरकर हिने सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एम.डी.गनी, वनवासी कल्याण आश्रमाचे रत्नागिरी जिल्हा सचिव श्री. विद्याधर मुळ्ये आणि महाविद्यालाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शंभरहून अधिक स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed.