मुंबई विद्यापीठातर्फे महाविद्यालयीन स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्यांना गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार दिला जातो. सन २०१६-१७ साठी विद्यापीठातर्फे महाविद्यालयीन स्तरावर “गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार”करिता गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक या पदावर काम करणारे श्री. प्रसाद गवाणकर यांची निवड झाली आहे. कार्यालयीन कामकाज, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक उपक्रम यांचा समन्वय साधणाऱ्या कर्मचाऱ्याचा गौरव हा पुरस्कार प्रदान करून केला जातो.
दि. २६ जानेवारी २०१८ रोजी मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे होणाऱ्या मुख्य पारितोषिक वितरण समारंभात श्री. प्रसाद गवाणकर यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार होणार आहे. रोख रु. ५०००, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यापूर्वी श्री. गवाणकर यांना गो. जो. महाविद्यालयाचा आदर्श कर्मचारी पुरस्कार (वर्ष-२०००), शिक्षकेतर कर्मचारी संघाचा कर्मचारी भूषण पुरस्कार (वर्ष-२०१२), आर्ट सर्कल, रत्नागिरीच्या कथास्पर्धेत प्रथम क्रमांक इ. सामाजिक आणि साहित्यिक सन्मान प्राप्त झाले आहेत.
या पुरस्काराबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी श्री. गवाणकर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.