राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची ‘म ते म: एक प्रवास’ ही एकांकिका महाअंतिम फेरीत दाखल झाली आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. २५ जानेवारी २०१८ रोजी राधाबाई शेट्ये सभागृह येथे संपन्न झाली. दि. १९ फेब्रुवारी रोजी विभागीय फेरी पार पडली आणि ‘म ते म’ ही एकांकिका महाअंतिम फेरीत दाखल होऊन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने रु. १५,००० चे रोख पारितोषिक पटकावले.
‘महाराष्ट्री ते मराठी’ या विषयावरच आपापले नाट्याविष्कार महाविद्यालयांना सादर करावयाचे होते. ‘महाराष्ट्री प्राकृत भाषा ते आजच्या मराठीपर्यंतचा प्रवास’ हे आशयसूत्र घेऊन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने ही एकांकिका सादर केली. त्याचे लेखन द्वितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थी शैलेश देविदास इंगळे याने केले असून संगीत विनायक प्रभूघाटे या तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्याने दिले आहे. एकूण तीस कलाकारांच्या संगीत, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, हस्तकला, कॅलिग्राफी, रांगोळी, हस्तकला, फोटोग्राफी या दहा कलांचा समावेश या एकांकिकेत आहे. एकांकिका सादर होत असतानाच केवळ सदतीस मिनिटात हे दहा कलाविष्कार सादर होतात, हे या नाट्यविष्काराचे वेगळेपण आहे.
विभागीय फेरीसाठी उपस्थित राज्य मराठी विकास संस्थेचे स्पर्धाप्रमुख गिरीश पतके यांनी विभागीय फेरीचे पारितोषिक रु. १५,००० व महाअंतिम स्पर्धेसाठीच्या खर्चाचा रु. १०,००० असा एकूण २५,००० रुपयांचा धनादेश प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्याकडे सुपूर्द केला.
‘रंगवैखरी’ स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून महाअंतिमफेरीत एकूण सहा नाट्याविष्कार सादर होणार आहेत. दि. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी यशवंत नट्यगृह, माटुंगा येथे ही महाअंतिम फेरी रंगणार आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ नाट्याविष्कारांना साडे सात लाख रुपयांची भरघोस बक्षिसे मिळणार आहेत.
र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी महाअंतिम फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या संपूर्ण स्पर्धेचे समन्वयक म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. निधी पटवर्धन व त्यांचे सहकारी परिश्रम करत आहेत.