गोगटे जोगळेकर महाविद्यालयात समाजशास्त्र विषयातून पदव्यूत्तर पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ‘सामाजिक संशोधनात घ्यावयाची दक्षता’ या विषयावरील कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेला साधन व्यक्ती म्हणून कोल्हापूर येथील सामाजिक विचारवंत डॉ. विजय मारुलकर उपस्थित होते. त्यांनी सामाजिक संशोधन विषयाची निवड इथपासून सामाजिक संशोधनातील निष्कर्ष इथपर्यंत सामाजिक टप्याविषयी सविस्तर माहिती दिली. अलीकडच्या काळात जागतिकिकरण आणि औद्योगिकरणामुळे सामाजिक गुंतागुंत वाढत असताना सामाजिक संशोधन कसे गरजेचे ठरते आहे; याविषयीचे विचार मांडून उपस्थित संशोधकांना संशोधनाच्या अनुषंगाने जागृत केले.
मुंबई विद्यापीठाच्या एम. ए. भाग- २ करीता अभ्यासक्रमात असलेल्या ‘क्षेत्रीय संशोधन पद्धती’ या विषयावरही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत समाजशास्त्र विभागातील पदवी आणि पदव्युत्तर विभागातील ४२ संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
पहिल्या सत्रात प्रा. शिवाजी उकरंडे यांनी कार्यशाळेची आवशकता, महत्व याची माहिती दिली. अखेरच्या सत्रात विभाग प्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे यांनी मुंबई विद्यापीठातील संशोधन प्रकल्प या अभ्यासविषयाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा आणि संशोधन विश्व विस्तृत बनविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. प्रा. सचिन सनगरे यांनी आभारप्रदर्शन केले.