मुंबई विद्यापीठाच्या ४९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाचा बक्षिस वितरण समारंभ नुकताच फोर्ट येथे दिमाखदार कार्यक्रमात संपन्न झाला. यावेळी वाङमय विभागातील स्पर्धांमध्ये सर्वसामान्य विजेतेपद मिळविल्याबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला गौरविण्यात आले. वक्तृत्व, वादविवाद या प्रकारांमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदकांची लयलूट करत महाविद्यालयाने हे सुयश प्राप्त केले.
मुंबई विद्यापीठाच्या ४९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवांतर्गत आयोजित वाङमयीन स्पर्धांमध्ये हिंदी गटातील वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रिया पेडणेकर हिने सुवर्ण पदक प्राप्त केले. मराठी वादविवाद गटात कल्पेश जाधव आणि ऐश्वर्या ओसवाल यांनी रौप्य पदकांची कमाई केली. यशस्वी विद्यार्थ्यांना कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा. शिवराज गोपाळे, प्रा. पंकज घाटे, प्रा. तेजस भोसले, प्रा. मधुरा आठवले, प्रा. महेश नाईक, प्रा. माधव पालकर आदी प्राध्यापकवृंदाचे मार्गदर्शन लाभले.
वाङमय विभागातील स्पर्धांमध्ये कला, शास्त्र, वाणिज्य, बी.एम.एस. आदी विविध शाखांमधील विद्यार्थ्यांचा समावेश होता. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.