गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त ‘टिळक अभिवादन’ यात्रेचे आयोजन करण्यात आले. २००६ पासून सुरु झालेल्या या उपक्रमाचे यंदाचे १२वे वर्ष आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणातून सकाळी ८ वाजता यात्रेचे सुरुवात होऊन सांगता टिळक जन्मभूमी येथे झाली.
अभिवादन यात्रा टिळक जन्मभूमी येथे पोहोचल्यानंतर संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांनी गीतेच्या ‘भक्तियोग’ अध्यायाचे पठण केले. तसेच जीजीपिएस प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. त्यानंतर टिळकांची आरती करून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या अभिवादन यात्रेस राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्यासह ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक पाटील, कार्यक्रम विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग सहभागी झाले.
या अभिवादन यात्रेस रत्नागिरीतील प्रतिष्ठीत उद्योजक श्री. नानासाहेब भिडे आणि श्री. आनंद भिडे यांच्या उपस्थितीत सर्वांना पेढ्यांचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला पुरातत्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी व कार्मचारी तसेच जोशी, भावे व भिडे कुटुंबियांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभारप्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले.