gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘शासकीय विकास योजना’ कार्यशाळेचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा मागासवर्गीय विकास कक्ष आणि समाजकल्याण कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय विकास योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून समाजकल्याण विभागाचे अधिकारी श्री. आनंद वळवी आणि श्री. अमोल पाटील उपस्थित होते.

मागासप्रवर्गातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची विस्तृत माहिती, सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या योजनेचा पुढील शिक्षणासाठी उपयोग व्हावा म्हणून भोजन, निवास व शैक्षणिक सुविधांसाठी ठराविक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी ही योजना अस्तित्वात आल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचीही सविस्तर माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रशासकीय प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले, ‘शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या बाबतीत शासन जागृत असून आर्थिक अडचणीपोटी शिक्षणात खंड पडू नये म्हणून मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत महाविद्यालय जाणीवपूर्वक प्रयत्नशील आहे.’ शासनाने अनेक कल्याणकारी योजना जाहिर केल्या असून आपलाल्या लागू होणाऱ्या योजनांचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्याने घेतला पाहिजे असे सांगून महाविद्यालय यासाठी सदैव आपल्यासोबत राहिल याची ग्वाही दिली.

मागासवर्गीय विकास कक्षाचे समन्वयक डॉ. शाहू मधाळे यांनी शैक्षणिक प्रगती करत असताना बार्टी व समाजकल्याण यांच्या योजनांबरोबरच इतर योजनांचा लाभ कसा करून घेता येईल याविषयी माहिती दिली. तसेच महाविद्यालय त्यासाठी पार पाडत असलेल्या कार्याचा उल्लेख करून समाजकल्याण कार्यालय, महाविद्यालय यांच्याप्रती आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. तुळशीदास रोकडे यांनी केले. सदर कार्यशाळेस अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील मागासवर्गीय विकास कक्षातील प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.