गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठ पदवी आणि पदव्युत्तर प्रमाणपत्र वितरण समारंभ महाविद्यालाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात नुकताच संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, फिनोलेक्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रबंधक श्री. मोहन कांबळे उपस्थित होते.
विद्यापीठगीताने पदवीदान सोहोळ्याचा प्रारंभ झाला. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पदवीधरांची गुणवैशिष्ट्ये त्यांनी विषद केली. शिकाऊ वृत्ती, निर्णयक्षमता, स्व-जाणिव, निसर्गाप्रती औत्सुक्य, स्वयंप्रेरणेने काम करण्याची क्षमता, जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, भावनिक संवेदनावरचे नियंत्रण आणि प्रयत्नाचे सातत्य या गुणांचा विकास करून जीवनात यशस्वी व्हा असा संदेश दिला.
कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पा पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांनी प्रसन्न वृत्ती, उत्साह, सकारात्मकता आणि दुसऱ्याला आनंदी ठेवणे सोबत आपणही आनंदी राहणे या गोष्टी आत्मसात करा असा मौलिक संदेश दिला.
प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांचा शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, आतापर्यंतचे आयुष्य आणि याक्षणानंतरचे आयुष्य यामाद्धे खूप फरक असणार आहे. पदवीपर्यंत तुम्ही सुरक्षित वातावरणात वाढलात; यापुढच्या आयुष्यातील निर्णयांना तुम्हीच जबाबदार असणार आहात. ज्यात रोजचा तुम्ही शिकणार आहात. आपलं ध्येय निश्चित करा. खडतर कष्टांना पर्याय नसतो. पण ते स्मार्ट वर्क असू द्या. स्व:तला सिद्ध केल्यावर समाजाला विसरू नका. स्वजनांना अंतर देऊ नका. आतापर्यंत तुमच्या शिक्षणासाठी सहकार्य केलेल्या पालक, शिक्षक आणि समाजाच्या निरंतर ऋणात रहा. असे म्हणून पदवीप्राप्त विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे त्यांनी अभिनंदन केले. आणि विद्यार्थांनी भावी जीवनाकरिता शुभेच्छा व्यक्त केल्या.
रसायनशास्त्र विभागाचा शुभम डाफळे आणि जीवरसायनशास्त्र विभागाची नादिया दलवाई यांनी मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक पटकावले. त्यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा खोवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तर पदवी आणि पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम समिती प्रमुख डॉ. शाहू मधाळे आणि सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.