‘शरीर आणि मनाची थकावट ही नैसर्गिक स्वरुपाची बाब आहे. विशिष्ट वेळेनंतर तो थकवा दूर केल्याने कार्याला नवउभारी प्राप्त होते. त्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपातील कार्यक्रमांची गरज असते. आजचा ‘गुण गायीन आवडी’ हा कार्यक्रम तशाच स्वरूपाचा असून निखळ मनोरंजन आणि व्याक्तीमनावरील ताणतणाव कमी करण्यास तो पोषक ठरेल’ असे मत रत्नागिरी जिल्हा न्यायाधीश श्री. राजेश जोशी यांनी केले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पुलं-गदिमा-बाबुजी जन्मशताब्दी सोहोळ्यानिमित्त आजोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री. सुनील चव्हाण, न्यायाधीश श्री. भिले, श्री. गायकवाड, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण प्रमुख श्री. शिरीष सासणे, सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंता श्री. जयंत कुलकर्णी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. शासनाचे स्तुत्य उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत नेऊन पोहोचविण्याचे कामी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिले आहे असे सांगून संस्था आणि महाविद्यालयाच्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोदजी तावडे यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना श्री. जोशी पुढे म्हणाले, विरंगुळा ही मानवी गरज लक्षात घेऊन समाजात अशा कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे. असे सांगून त्यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री. सुनील चव्हाण यांनी या स्तुत्यस्वरुपाच्या कार्यक्रमास आपल्या शुभेच्छा व्यक्त करताना रात्नागीरीकारांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरो अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्याध्यक्ष श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्थेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांनी असा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने उपलब्ध करून दिल्याने शासनाचे आभार मानले. त्यानंतर सुरभी कार्यक्रमाचे निर्माते श्री. मोहन पारसनीस व श्री. ओंकार भिसे यांचे मान. जिल्हाधिकारी आणि जिल्हान्यायाधीश यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
नंतर पुलं-गदिमा-बाबुजी या त्रिमुर्तींच्या कलाकृतींवर आधारित सांगितिक, साहित्यिक, अभिवाचन, नृत्य, प्रहसन, द्रुकश्राव्य सादरीकरणाने नटलेल्या व तीस ते पस्तीस कलाकारांसह या विविधरंगी कार्यक्रमाचा सुमारे सातशे श्रोत्यांनी मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. तेजश्री भावे यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच सांस्कृतिकप्रेमींनीही हजेरी लावली. आणि जवळ जवळ तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले.