गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे ‘महिला दिनानिमित्त’ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरी शहरातील स्वस्तिक तसेच चिरायू हॉस्पिटलशी सलग्न असणाऱ्या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. ज्योती चव्हाण यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य तपसणी केली. डॉ. ज्योती चव्हाण, डॉ. गीतांजली ढेरे यांच्यासह सहायिका जुईली शेरवे, मृणाल लिंगायत, श्रद्धा डुकले आणि सौ. मोरे यांनी आरोग्य तपासणी शिबिराला हातभार लावला. सदर शिबिरामध्ये वसतिगृहातील ७९ विद्यार्थिनी, ३६ महिला प्राध्यापिका आणि कर्मचारी यांनी आरोग्य तपासणी करून घेतली.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महाविद्यालयात आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थिनीदेखील शिक्षण घेत असतात. अशा विद्यार्थिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी अत्यंत लाभदायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
स्त्रियांचे आरोग्य हा महिला सक्षमीकरणाचा एक महत्वाचा पैलू आहे. विद्यार्थिनी तसेच महिलांमध्ये स्त्रीआरोग्य हा महत्वाचा विषय आहे; हे अधोरेखित करण्यासाठी अशा प्रकारच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन उपयुक्त असल्याचे प्रतिपादन डॉ. ज्योती चव्हाण यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे प्रा. उमा जोशी, प्रा. अतिका राजवाडकर, डॉ. निधी पटवर्धन आणि प्रा. रश्मी भावे यांनी महिला आरोग्य तपासणी शिबिराचे नेटके आयोजन केले.