gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘हिंदी एकता दिवस’ कार्यक्रम संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात हिंदी एकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ अनिल ढवळे यांचे ‘सूचना प्रौद्योगिकी और हिंदी भाषा’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रा. डॉ. ढवळे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, कोरोना महामारी, लॉकडाऊन यामुळे अन्य क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातही आमूलाग्र असे बदल घडून आले आहे. कोरोना काळातील दोन वर्षातील ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत असताना अनेक तांत्रिक बाबी महत्वाच्या ठरल्या आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत गुगल, वेब, युनिकोड, व्हाट्सएप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी तंत्रज्ञानाचे महत्व वाढले आहे. माहिती-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आजमितीला आपल्याला अनेक तांत्रिक सुविधा उपलब्ध असून,  प्राध्यापक व विद्यार्थी ऑनलाईन तंत्र अवगत करणे आवश्यक आहे. कार्यालयीन कार्य ऑनलाईन करीत असताना आपण अधिक सतर्क होणे गरजेचे असून, घरबसल्या स्मार्ट फोनवर केल्या जाणाऱ्या सर्व बाबी समजून घेणे आवश्यक आहे. विद्यापीठाने अभ्यासक्रमात समाविष्ठ केलेले विषय आणि त्यातील उपघटक महत्वाचे आणि जीवनावश्यक असून, त्यामुळे प्रगतीचा मार्ग खुला होतो, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगतात हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी हिंदी भाषेचा इतिहास आणि महत्व विशद केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. चित्रा गोस्वामी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना  प्राचार्य डॉ. पी.पी. कुलकर्णी यांनी विद्यमान वर्षी साजरा होत असणारा गोगटे जोगळेकर  महाविद्यालयाच्या अमृत महोत्सव, महाविद्यालयाची वाटचाल याविषयी माहिती देऊन हिंदी दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे आय.क्यु.ए.सी.चे समन्वयक आणि कला शाखा उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी हिंदी विभागाच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. कृष्णात खांडेकर यांनी केले. कार्यक्रमाला महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Comments are closed.