रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय कोकणातील एक नामांकित महाविद्यालय असून महाविद्यालयाचा एक महत्वपूर्ण दस्तऐवज असलेला व नवउन्मेषी विद्यार्थी लेखक यांच्यासाठी व्यासपीठ ठरणारा ‘सहकार’ या वार्षिक अंकास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई कडून गौरविण्यात आले. जेष्ठ पत्रकार व कार्याध्यक्ष, नवनिर्माण शिक्षण संस्था श्री. अभिजित हेगशेट्ये, जिल्हा समन्वयक श्री. अभिजीत खानविलकर, युवा प्रमुख श्री. संतोष मेकले यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचेकडे हा गौरव प्रदान करण्यात आला. या प्रसंगाची विशेष आठवण म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रमुख अतिथी, सहकार संपादक व विद्यार्थी प्रतीनिधी यांना पुस्तके भेट देण्यात आली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई ही मुंबई स्थित संस्था असून राज्य स्तरीय नियतकालिक स्पर्धा, मा. श्री. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप, अभिसरण युथ एक्सेंज प्रोग्राम, राज्यस्तरीय युवा पुरस्कार, विविध नेतृत्व आणि विकास शिबिरे, सोबत युवा, महिला, शिक्षण, आरोग्य विषयक उपक्रम, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, सांकृतिक या विभागात कार्यरत असणारी संस्था आहे. स्थानिक पातळीवरील विद्यार्थी विकास व समुदाय विकास या उद्देशाने महाविद्यालयात अनेकविध उपक्रमाचे आयोजन करण्याचे कार्य या संस्थेकडून केले जात आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सन २०२०-२१ च्या सहकार या अंकास उत्कृष्ट अंक म्हणून विशेष पुरस्कार देण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्री. अभिजित हेगशेट्ये यांनी कोकणातील लेखकांच्या योगदानाचा उल्लेख करून या लेखन असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या संधीचे मार्गदर्शन केले. विशेष करून आपल्या विद्यार्थी दशेतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देत महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहन, संधी यांचाही गौरव केला. विद्यार्थी लेखकांना प्रेरित व मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
जिल्हा समन्वयक श्री. अभिजित खानविलकर यांनी विद्यार्थांसाठीचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे विविध उपक्रम यांची माहिती दिली. युवा प्रमुख श्री. संतोष मेकले यांनी उपस्थित युवकांना प्रेरणा देत विविध नेतृत्व आणि विकास शिबिरे, सोबत युवा, महिला, शिक्षण, आरोग्य विषयक उपक्रम यांची माहिती सांगितली.
सहकार अंकाचे संपादक डॉ. तुळशीदास रोकडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सहकार अंकाची वैशिष्ट्ये, संपादक मंडळाचे कार्य, कला, विज्ञान व वाणिज्य शाखा उपप्राचार्यांचे योगदान, प्राचार्यांचे मार्गदर्शन यामुळे सहकार अंक अधिक दर्जेदार बनविता आला असे मत व्यक्त केले. कार्यक्रम अध्यक्ष व प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी डिजिटल व मुद्रित अशा दोन्ही माध्यमातून सहकार अंक उपलब्ध असून हा अंक विद्यार्थांच्या सकारात्मक शक्तीसाठी अभिव्यक्तीचे योग्य व्यासपीठ आहे असे सांगून सहकारी प्राध्यापक, संपादक मंडळ व विद्यार्थी नवलेखक यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. सचिन सनगरे यांनी केले. या गौरव समारंभास महाविद्यालायचे विविध शाखांतील प्राध्यापक, सहकार संपादक सदस्य व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.