अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा सरावाचा शुभारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला. श्रीशिवछात्रपती पुरस्कार विजेती कॅरमपटू आणि महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असलेल्या कु. मैत्रयी गोगटे हिच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रीडा सरावाचा शुभारंभ केला. याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, शालेय समितीचे अध्यक्ष श्री. उल्हासजी लांजेकर, उपप्राचार्या प्रा. विशाखा सकपाळ, पर्यवेक्षक प्रा. अनिल उरुणकर, प्रा. सुशील वाघधरे आणि मैत्रयीचे पालक उपस्थित होते.
महाविद्यालयातर्फे कु. मैत्रयी गोगटे हिचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी तिने महाविद्यालयाकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी खेळाबरोबरच अभ्यासालाही महत्व द्यावे असा सल्ला उदयोन्मुख खेळाडूंना दिला.
उपप्राचार्या प्रा. विशाखा सकपाळ यांनी क्रीडा विभागाच्या गौरवशाली परंपरेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. एक आदर्श खेळाडू आणि विद्यार्थी म्हणून कु. मैत्रयीबद्दल बोलताना याच क्रीदाविभागाने चार शिवछत्रपती पुरस्कार विजेते घडवले हे आवर्जून सांगितले.
कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने खेळाकडे लक्ष द्यावे असे सांगून खेळ आणि अभ्यास यात समतोल साधत शिस्तीचा अंगीकार करावा असे नमूद केले. भविष्यात आपल्या महाविद्यालयाला आणि रत्नागिरी शहराला गौरव प्राप्त करून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या आयोजनात प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया टोळ्ये यांनी केले.