अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात ‘वाङ्मय मंडळा’च्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. विशाखा सकपाळ, प्रमुख पाहुण्या सौ. जयश्री बर्वे, पर्यवेक्षक प्रा. अनिल उरुणकर आणि वाङ्मय मंडळ समन्वयक प्रा. विस्मया कुलकर्णी उपस्थित होत्या.
‘वाचन- आंतरिक समृद्धीकडे नेणारा मार्ग’ या विषयावर प्रमुख वक्त्या प्रा. सौ. जयश्री बर्वे यांनी विविध पुस्तकांचे दाखले देत वाचनाने माणूस कसा समृद्ध होतो हे विषद केले. विविध विषयांच्या ग्रंथांचे वाचन केल्याने आपल्याला त्या विषयांतील विविध संकल्पना माहित होतात; असे सांगून विद्यार्थ्यांना अधिक वाचनास प्रवृत्त केले .
उपप्राचार्या विशाखा सकपाळ यांनी आपल्या मनोगतात जीवन समृद्ध होण्यासाठी विविध पुस्तकांचे विशेषत: चरित्रपर पुस्तकांचे वाचन करावे असे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजीमधील काही दर्जेदार आणि अभिजात साहित्यकृतीतील निवडक भागांचे अभिवचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. क्षमा पुनस्कर तर आभारप्रदर्शन प्रा. बी. व्ही. रानडे यांनी केले. सदर ‘वाङ्मय मंडळा’च्या कार्यक्रमाला अध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.