gogate-college-autonomous-updated-logo

आपणाबरोबर आणखी एका माणसाला संस्कृतची गोडी लागावी- कुलगुरू डॉ. उमा वैद्य

“संस्कृत भाषा ही परिपूर्ण भाषा आहे. संगणकासाठी ती जास्त अनुकूल आहे. ती शिकण्याचा व तिचा प्रसार करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. इतर भाषांपेक्षा या भाषेत खूप काही वैशिष्ट्ये दाखवून संस्कृतच्या अभ्यासाची गोडी निर्माण करायला हवी. त्यासाठी प्रत्येकाने आपणाबरोबर आणखी एका माणसाला अशावेळी बरोबर नेले तरी याचा उत्तम प्रसार होईल”; असे प्रतिपादन कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात बोलताना केले. अविरतपणे सुरु असणाऱ्या कालिदास-स्मृति-समारोह व्याख्यानमालेच्या सष्ट्यब्दिपुर्ती वर्षाचे औपचारिक उद्घाटन डॉ. उमा वैद्य यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले; याप्रसंगी त्या बोलत होत्या.

संस्कृत भाषेची गोडी वाढण्याकरिता मुलांच्या खेळांमध्ये नाविन्य आणून बुद्धिबळ, पत्ते अशा खेळांमधूनही संस्कृत शिकवता येते. हे स्वानुभवातून त्यांनी सांगितले. संस्कृतच्या विकासात अशातऱ्हेचे प्रयोग महत्त्वपूर्ण ठरतात तसेच याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाशी संस्कृतच्या लोकांनी जास्त ‘अपडेट’ राहून त्या माद्यमातूनही संस्कृत शिकविले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

या औपचारिक उद्घाटन कार्यक्रमात शहरातील निवृत्त संस्कृत शिक्षकांना डॉ. उमा वैद्य यांचे हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

सौ. सुमन भालचंद्र ठाकूरदेसाई, श्री. वामन विश्वनाथ दांडेकर, श्री. नरहर रामचंद्र अभ्यंकर, श्री. बाजीराव श्रीपाद जोशी, श्री. हरीश्चंद्र गणपत गीते, सौ. सुषमा श्रीकांत वहाळकर, सौ, शुभांगी अभ्यंकर, श्री. विनायक नारायण पोखरणकर, सौ. पद्मजा बाळकृष्ण बापट, सौ. ललिता दांडेकर, सौ. सुषमा श्रीकांत वहाळकर, श्री. श्रीकांत दामोदर वहाळकर, सौ. सुनिता शशिकांत भावे, सौ. अनुराधा दिगंबर तारगावकर, सौ. वंदना दिगंबर घैसास, सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, सौ. वृंदा विनायक गांधी, श्रीम. रोहिणी शेवडे, श्री. श्रीकृष्ण गणेश जोशी, सौ. वैशाली चंद्रकांत हळबे, श्री. पद्मनाभ विनायक जोशी आदींचा त्यामध्ये समावेश होता. श्री. विनायक पोखरणकर आणि सौ. वंदना घैसास यांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त करताना आपले अनुभव व कार्य विषद केले आणि या उपक्रमाबद्दल महाविद्यालयाला धन्यवाद दिले. या शिक्षकांचा सत्कार म्हणजे आपल्याच गुरूंचा सत्कार करण्याची भावना मनात दाटून आल्याने मन भरून आल्याचे याप्रसंगी डॉ. उमा वैद्य म्हणाल्या.

‘गीर्वाणकौमुदी’ या संस्कृतच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अंकाचे प्रकाशनही डॉ. उमा वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे अध्यक्ष म्हणून लाभले. अशा उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक करताना संस्था नेहमीच पाठीशी राहिल असे म्हणाले. त्यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांचा सत्कार करण्यात आला.

सन्मानपत्रासाठी संस्कृत लेखन करण्याची जबाबदारी विशेषत्वाने पार पाडलेल्या तन्मय प्रदीप हर्डीकर (तृतीय वर्ष कला) यालाही कुलगुरू डॉ. उमा वैद्य यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

संस्कृत गीताने कार्यक्रमाची सुरुवात होऊन शान्तिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, संस्कृतप्रेमी नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयंत अभ्यंकर यांनी केले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments are closed.