‘नेतृत्व म्हणून नावारूपाला यावे हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे ध्येय असावे’- कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर
गोगटे जोगळेकर महाविद्यायाला नुकतीच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थी-शिक्षक संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील ‘मटेरीअल रिसर्च लॅबोरेटरी’चे उद्घाटन कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आले. nano-material synthesis, semiconductor, material, thin film deposition and characterization अशा अद्ययावत सुविधा प्राप्त होणार आहेत. या सुविधांचा लाभ रत्नागिरी विभातील संशोधकांनासुद्धा होईल.
सदर कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाच्या विस्तृत कार्याचा आढावा डॉ. राजीव सप्रे यांनी कुलगुरुंसमोर दृकश्राव्य पद्धतीने ठेवला. महाविद्यालयाच्या ४० शिक्षणक्रमांतून तसेच २० कौशल्य आधारित उपक्रमांतून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी महाविद्यालय यशस्वीरित्या पार पाडत आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक, अध्ययन आणि संशोधन क्षेत्रात नेत्रदीपक यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान. कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला.
शिक्षक-विद्यार्थी संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी आपल्या कार्यकाळात उपकेंद्रांना सक्षम करण्याकडे आपला जास्त भर असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन गरजांनुसार विद्यापीठ नवनवीन कौशल्य आधारित अभ्यासक्रम व उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. येणाऱ्या युगाची गरज लक्षात घेऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी कार्यरत असले पाहिजे. चौथी औद्योगिकक्रांती ही डिजिटल क्रांती असून आजच्या काळात डिजिटल जॉब आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. विद्यार्थ्यांनी भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन शिक्षणाचा वापर करून आपल्या नेतृत्वसंधींचा विकास साधला पाहिजे.
६२% युवक संख्या असणाऱ्या भारतासारख्या देशात लोकसंख्येचा लाभांश मिळविण्यासाठी युवकांना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम केले गेले पाहिजे. विद्यार्थ्यांना बदलत्या जागाची जाणीव ठेऊन बदलत्या जगाशी सर्वसमावेशक स्वरूपाची वृत्ती धारण केली पाहिजे. स्वत:च्या शोधासाठी शिक्षण कायम महत्वाचे ठरते. आपले प्रतिबिंब दर्शविणारा आरसा म्हणून शिक्षणाकडे पाहून स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नशील असावे. या शिक्षणाचा उपयोग समाजसेवा, देशसेवा यासाठी झाला पाहिजे; हा संदेश कुलगुरूंनी संवादादरम्यान विद्यार्थी व शिक्षकांपुढे ठेवला.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी आपल्या अध्यक्षिय मनोगतात विद्यार्थ्यांनी स्वत:चा सर्वांगीण विकास आणि समाजनिष्ठेचा दृष्टीकोन समोर ठेऊन शिक्षण घेण्याची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोगटे जोगळेकर महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. स्वागत आणि सूत्रसंचालन प्रा. तेजश्री भावे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.