रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘भारतीय संविधान दिन’ वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
दि. २६ नोव्हेंबर रोजी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांकडून राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करून घेतले केले. यावर्षीचा विशेष उपक्रम म्हणजे राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी रत्नागिरीतील शाळांमध्ये जाऊन राज्यघटनेच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन हा उपक्रम राबविला. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्व सांगून त्यांच्याकडून सरनाम्याचे सामूहिक वाचन करून घेण्यात आले. विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती व्हावी, संविधानिक मूल्ये त्यांच्यात रूजावी, हा या उपक्रमामागील हेतू होता. राज्यशास्त्र विभागाचा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने देखील ऑफलाईन स्वरूपात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी हिंदी विभागप्रमुख प्रा.डॉ.शाहू मधाळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या प्रा. डॉ. सोनाली कदम, प्रा. शिवाजी उकरंडे, प्रा. डॉ. एम. डी. गनी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाप्रती आदर आणि निष्ठा ठेऊन वागले पाहिजे. घटनेतील तत्वाप्रमाणे वागलो तर निश्चितच देशाचा व्यवहार चोख होईल. राज्यघटना ही एक जिवंत दस्ताऐवज असल्याचे मत प्रा. डॉ. शाहू मधाळे यांनी व्यक्त केले, तर प्रत्येक नागरिकाने संविधान, त्यातील मूल्यांचा अंगीकार केला पाहिजे. आपण समता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्य ही मूल्ये जोपासत असतो, संविधानाच्या वाचनाने ही मूल्ये आपण आपल्यात रुजवावित, असे प्रतिपादन डॉ. सोनाली कदम यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील मोजके शिक्षक-विद्यार्थी उपस्थित होते.
संविधान दिन साजरा करण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी यांचे बहुमोल मार्गदर्शन तर प्रशासकीय उपप्राचार्य प्रा.डॉ.मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, प्रा.डॉ.अपर्णा कुलकर्णी, प्रा. डॉ. यास्मिन आवटे, समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे आदींसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून वरील सर्व कार्यक्रम संपन्न झाले.