gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालायात ‘जागतिक पाणथळ दिन’ विविध कार्यक्रमांनी साजरा

जागतिक पाणथळ दिन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्यावतीने नुकताच ‘जागतिक पाणथळ दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावर्षीच्या पाणथळ दिनाची संकल्पना पाणथळ जागा व जैवविविधता अशी होती. विद्यार्थ्यांना पाणथळ दिनाच्या संकल्पनेवर आधारित मार्गदर्शन प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मधुरा मुकादम यांनी केले. यावेळी त्यांनी जगातील व भारतातील विविध पाणथळ जागा, त्यांचे प्रकार व त्यामध्ये आढळणारी जैवविविधता याविषयी सखोल माहिती दिली.

सहसंचालक, कोकण विभाग डॉ. संजय जगताप तसेच सोमय्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. विजय जोशी यांनी महाविद्यालयाला भेट दिली. मान्यवरांची भेट आणि जागतिक पाणथळ दिन याचे औचित्य साधून प्राणीशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी पाणथळ जागांचे संरक्षण व संवर्धन करण्याची शपथ घेतली.
रत्नागिरीतील अलावा, मिऱ्या येथील समुद्र किनाऱ्यावर क्षेत्र भेटीचे आयोजन केले गेले. विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेटीदरम्यान समुद्र किनाऱ्यावरील जैवविविधतेचा अभ्यास करून आपली निरीक्षणे नोंदविली. ओहोटीच्यावेळी समुद्र किनाऱ्यावर आढळणाऱ्या प्राण्यांच्या विविध प्रजाती यामध्ये शंखातील प्राणी, समुद्र काकडी, विविध खेकड्यांच्या प्रजाती, तारामासा व काही शैवाल प्रजाती इ. विद्यार्थ्यांना जवळून अभ्यासात आल्या.

महाविद्यालयाच्या कै. डॉ. ज. शं. केळकर सभागृहामध्ये ‘पाणथळ दिनाच्या’ संकल्पनेवर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना विज्ञान विभागाचे उपप्राचार्य विवेक भिडे यांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

या उपक्रमांमुळे पाणथळ जमीन ही वाया गेलेली जमीन व कचरा टाकण्यासाठी जागा म्हणून न पाहता जैवविविधता आणि पर्यावरण साखळीचा दुवा म्हणून पहिले पाहिजे, असा दृष्टीकोन व जागरूकता विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण व्हावी यासाठी महाविद्यातील प्राणीशास्त्र विभाग गेली १५ वर्षे विविध उपक्रम राबवत आहे.

संपूर्ण कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed.