गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे पावसाळ्यामध्ये आढळणाऱ्या विविध रानभाज्यांचे आणि खारफुटी वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे हस्ते आणि विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, डॉ. यास्मिन आवटे, डॉ. मीनल खांडके, प्रा. अश्विनी देवस्थळी यांचे उपस्थितीत झाले.
या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळणार्या रायझोफोरा म्युक्रोनाटा, रायझोफोरा अपेटला, लुमनित्झेरा, अविसेनिया, एजिसेरास, सेरियोप्स, अकॅथस, सोनरेशिया या विविध खारफुटी वनस्पती, त्यांच्यामध्ये आढळून येणारी वैशिष्ट्य, सहयोगी वनस्पती- करंज, खुळखुळी, डेरीस, सागरगोटा, इ. यांबद्दल वनस्पतिशास्त्र विषयाच्या द्वितीय व तृतीय वर्ष विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी माहिती दिली.
पावसाळ्यामध्ये रत्नागिरीत आढळणाऱ्या विविध रानभाज्या विद्यार्थ्याना माहीत व्हाव्या त्यांचे महत्त्व आणि फायदे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास यावे या दृष्टिकोनातून रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले. यामध्ये सामान्यतः खाल्ल्या जाणाऱ्या टाकळा, भारंगी, कुर्डू या भाज्यांसोबतच दिंडा, करंदा, घोळ, अंबुशी, अळंबी, आघाडा, चवई, इ. भाज्यांचा समावेश होता. यामध्ये विद्यार्थ्यांना या रानभाज्यांचे वर्णन आणि त्यांच्यापासून बनवले जाणारे पदार्थ याबद्दल वनस्पतीशास्त्र विभागाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.
या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या प्रदर्शनास विद्यार्थ्यानी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ सोनाली कदम आणि वनस्पतिशास्त्र विभागातील प्रा. शरद आपटे, डॉ. विराज चाबके, प्रा. ऋजुता गोडबोले आणि प्रा. प्रियांका शिंदे-अवेरे यांचे मोलाचे सहाय्य लाभले.