gogate-college-autonomous-updated-logo

भारतीय संस्कृतीच्या अभ्यासात आगम ग्रंथांचा अभ्यास महत्त्वपूर्ण – ६५ व्या कालिदास स्मृति समारोह व्याख्यानमालेत बोलताना डॉ. स्वाती द्रविड यांचे प्रतिपादन

kalidas-memorial-lecture-series-march-2022

प्रतिवर्षाप्रमाणे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात नुकतेच दिनांक ४ व ५ मार्च २०२२ रोजी गोगटे कॉलेजमध्ये ६५ व्या कालिदास स्मृति समारोह व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेसाठी मुंबई येथील अनंताचार्य इंडॉलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या उपसंचालक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ.स्वाती द्रविड या व्याख्यात्या म्हणून लाभल्या होत्या. त्यांनी दोन दिवस ‘आगम ग्रंथातील वैष्णव परंपरा’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली.

आगम ग्रंथ म्हणजे काय, आगम ग्रंथांचे प्रकार आणि आगम ग्रंथातील विविध परंपरा यांचा पहिल्या व्याख्यानात आढावा घेऊन दुसऱ्या दिवशी आगम ग्रंथातील वैष्णव परंपरा स्पष्ट करताना वैखानस आणि पांचरात्र या परंपरा विशेषत्वाने स्पष्ट केल्या. विष्णु देवता, तिची आयुधे, देवालय, पूजा, देवालय इ. उभारण्यासाठी भूमीपरीक्षा आणि विष्णुबरोबर असलेले लक्ष्मीदेवतेचे महत्त्व आणि तिचे स्वरूप असे विविध विषय विशद केले. भारतात आणि भारताबाहेरही आगम ग्रंथांच्या अभ्यासाचे महत्त्व सांगून भारतात अभ्यास परंपरा कशी सुरु झाली याविषयीही माहिती दिली. यातून उपस्थित श्रोत्यांना नवीन अभ्यास विषय कळून आला. यावर्षीची व्याख्यानमाला ही ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी या अभ्यासपूर्ण व्याख्यानांबद्दल समाधान व्यक्त केले आणि डॉ.स्वाती द्रविड यांना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधी लवकर प्राप्त व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक आणि वक्त्यांचा परिचय संस्कृतविभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी करून दिला. यावेळी त्यांनी कालिदास स्मृति समारोह व्याख्यानमालेचा आढावा घेतला आणि यापूर्वी लाभलेल्या काही प्रसिद्ध व्याख्यात्यांची माहिती उपस्थितांना करून दिली. तसेच यावेळी या व्याख्यानमालेच्या निमित्ताने विभागातील विद्यार्थ्यांना काही माजी विभागप्रमुख आणि संस्कृतच्या हितचिंतकांनी विभागात ठेवलेल्या पारितोषिकांची माहिती दिली.

ही व्याख्यानमाला ऑनलाईन माध्यमातून घेण्यासाठी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीत सुरु झालेल्या भारतरत्न डॉ.पी.व्ही.काणे उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे आणि उपकेंद्रातील त्यांचे सहयोगी आशिष आठवले यांचे विशेष सहकार्य लाभले.

पहिल्या दिवशी एम्.ए.ची विद्यार्थिनी पर्णिका भडसावळे आणि दुसऱ्या दिवशी तृतीय वर्षाचा विद्यार्थी मयुरेश जायदे यांनी मंगलाचरण सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली तर दोनही दिवस एम्.ए.ची विद्यार्थिनी ऐश्वर्या आचार्य हिने शान्तिमंत्र म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. या संपूर्ण व्याख्यानमालेसाठी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई तसेच विविध विद्याशाखांचे प्राध्यापक उपस्थित होते.

संपूर्ण व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन संस्कृत विभागातील प्राध्यापिका स्नेहा शिवलकर आणि आभारप्रदर्शन प्राध्यापक जयंत अभ्यंकर यांनी केले. या व्याख्यानमालेकरीता सुमारे १०० श्रोत्यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला.

Comments are closed.