gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत खारफुटीच्या रोपांची लागवड

देशाच्या तुलनेत कोकणात 30 टक्के खारफुटी आढळते. जलचरांच्या प्रजननासाठी उपयुक्त असलेल्या खारफुटी जंगलांची तोड होत असल्याचेही दिसते. या तोडीला आळा घालण्यासाठी खारफुटी संरक्षण कायदा आहे. खारफुटीच्या जैवविविधतेमध्ये अनेक प्राणी व पक्षी असून माणसाला अनन्यसाधारण उपयोग आहे. दि. 26 जुलै हा दिवस ‘जागतिक खारफुटी दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाने निसर्ग मंडळातर्फे रत्नागिरीच्या आरे परिसरामध्ये खारफुटीच्या रोपांची लागवड करण्याचा उपक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी मान. श्री. दत्ता भडकवाड उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘खारफुटी वनस्पती नेहमी खाडी किंवा समुद्रकिनारी उगवतात. खारफुटी नेहमी सागरी किनाऱ्याचे वारा, वादळ, त्सुनामी पासून संरक्षण करतात. वाढते औद्योगिकरण व प्रदूषण, वृक्षतोड यासारख्या कारणांमुळे खारफुटी वनस्पतींचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. त्यामुळे अशा उपयुक्त खारफुटीचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.’

पर्यावरणास अत्यंत उपयुक्त असणाऱ्या खारफुटीचे संवर्धन व संरक्षण व्हावे यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने राबवलेल्या वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमासाठी प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

Comments are closed.