गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्याकरिता घेण्यात येणारी कोकण प्रज्ञा शोध परीक्षा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता प्रतिवर्षी आयोजित केली जाते. या अनुषंगाने विद्यमानवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील परीक्षेचे काम पाहणारे तालुका समन्वयक यांची सभा गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे नुकतीच संपन्न झाली.
कोकण प्रज्ञा शोध परीक्षेचे हे २२ वे वर्ष असून तालुका समन्वयकाकडून आलेल्या विविध सूचनांवर सविस्तर चर्चा झाली. या सभेकरिता सौ. वैदेही बिवलकर, श्री. उज्ज्वल शिंदे, सौ. शलाका शेंड्ये इ. उपस्थित होते. सभेला गोगटे जोगळेकर महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, प्रा. जी. एस. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
यावर्षीपासून कोकण प्रज्ञा शोध परीक्षेच्या विद्यार्थी नाव नोंदणी प्रक्रियेमध्ये थोडा बदल झाला आहे. शाळांनी परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती एकत्रितपणे ई-मेलद्वारे पाठवायची आहे. याकरिता आवश्यक ‘एक्सेल फाईल फॉरमॅट’ महाविद्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांची माहिती या ‘एक्सेल फॉरमॅट’मध्ये भरून सदर फाईल या resgjckts@gmail.com या ई-मेलद्वारे पाठवावी. याबाबत काही अडचण आल्यास डॉ. विवेक भिडे (९४२११३९२९६); प्रा. चेतन मालशे (९५९४३७१३२४) यांना किंवा resgjckts@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा; असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.