‘अपयश हीच यशाची पहिली पायरी मानावी. अपयशाने खचून न जाता आपण पुन्हा प्रयत्न केल्यास पहिल्यापेक्षा जास्त किंबहुना अधिक असे उज्ज्वल यश मिळेल; असा आशावाद ठेवावा. कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास कोणतेही काम यशस्वी होते. वर्तमानपत्र किंवा टी.व्ही.वरील बातम्या नियमित पहाव्यात, त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारची माहिती सातत्याने मिळते.’ असे प्रतिपादन जिल्हा वित्त व लेखा अधिकारी श्री. प्रशांत जगताप यांनी केले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता विद्यमानवर्षी घेण्यात आलेल्या कोकण प्रज्ञा शोध परीक्षेमधील यशस्वी प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ रविवार दि. २५ फेब्रुवारी २०१८ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संपन्न झाला. यादिवशी सकाळच्या सत्रात गुणवान विद्यार्थ्यांच्या पालकांना ‘पालक सभेत’ मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सदर कार्यक्रम गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सभागृहात संपन्न झाला.
श्री. जगताप यांनी पालकांना संबोधित करताना पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालकांनी जागृत राहणे गरजेचे असून मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्यास मदत करणे हेच पालकांची खरे कर्तव्य आहे. मुलांना विश्वासात घेऊन त्यांना मार्गदर्शन केल्यास निश्चितच ते प्रगती करतील. पाल्याशी विश्वासाचे नाते निर्माण करणे काळाची गरज आहे. अभ्यास म्हणजे सर्व काही नसून सर्वांगाने व्यक्तिमत्व विकास हे खरे उद्दीष्ट समोर ठेवल्यास पालकांनाही आनंद मिळेल असे सांगून त्यांनी उपस्थित पालकांशी चर्चात्मक संवाद साधला. आपल्या मार्गदर्शनानंतर त्यांनी पालकांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरेही दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. महेश नाईक यांनी केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या शुभहस्ते प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक श्री. प्रशांत जगताप यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू प्रदान करून सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन प्रा. महेश नाईक यांनी तर आभारप्रदर्शन श्री. प्रसाद गवाणकर यांनी केले. या पालक सभेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातील गुणवान विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते.