रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे आद्य देणगीदार कै. नारायण रघुनाथ गोगटे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
अगणित विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारी शैक्षणिक संस्था निर्माण करण्यासाठी कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांनी आपले जीवन समर्पित केले. जोशी दांपत्याच्या कार्याला कै. नारायण रघुनाथ गोगटे यांनी आपल्या दातृत्वाने हातभार लावला. सुरुवातीच्या खडतर वाटचालीमध्ये संस्थेला देणगी देऊन कै. नारायण गोगटे यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी महाविद्यालयात कै. नारायण रघुनाथ गोगटे यांच्या स्मृतिदिनाचे आयोजन करण्यात येते.
कै. नारायण गोगटे यांच्या स्मृतिदिनानमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी प्रतिमेला पुष्पगुच्छ वाहून अभिवादन केले. आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ. साखळकर यांनी महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या प्रतिकूल काळापासून ते महाविद्यालय नावारूपाला येऊन स्वायत्त दर्जा प्राप्त होणे या काळापर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला. कै. नारायण गोगटे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आर. पी. गोगटे कला आणि विज्ञान महाविद्यालय या नावाने महाविद्यालय सुरु करण्यासाठी देणगी दिली आणि १९४५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटने महाविद्यालयास सुरु करण्याची मंजुरी दिली. त्या अंतर्गत बॉम्बे प्रेसिडेन्सी, सिंध प्रांतात एकूण नऊ महाविद्यालय १९४५ साली सुरु झाली. त्यातील रत्नागिरीत आपले एक महाविद्यालय सुरु झाले. आज हे महाविद्यालय एक उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून नावारूपाला आले आहे. महाविद्यालयातील येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये आणि जाणीव समृद्ध करून शिक्षकांनी नि:स्वार्थपणे कार्य करावे, असे आवाहन उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन समारंभ समितीचे सदस्य डॉ. रामा सरतापे यांनी केले. कार्यक्रमास प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, कलाशाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. सीमा कदम आणि विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आदि मान्यवरांसह विविध विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.