gogate-college-autonomous-updated-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘सामुहिक वाचनाने’ वाचन संकल्प पंधरवडा उपक्रमाचा प्रारंभ

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२६’ या उपक्रमांतर्गत दि. १ जानेवारी ते दि. १५ जानेवारी २०२६ असा ‘वाचन पंधरवडा’ विविध वाचन प्रेरणाविषयक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. या पंधरा दिवसांमध्ये वाचनविषयक उपक्रमांतर्गत निबंध स्पर्धा, ग्रंथ अभिवाचन, साहित्य संवाद, लेखक आपल्या भेटीला, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथ दिंडी, प्राध्यापक-कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे सामुहिक ग्रंथवाचन, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्याचा अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गोष्टी आणि बोधकथा वाचन-कथन उपक्रम, पथनाट्य असे वाचन चळवळीला पुरस्कृत करणारे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.  

आज दि. १ जानेवारी रोजी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘सामुहिक ग्रंथ वाचन’ केले. आपल्या आवडीनुसार विविध विषयांवरील पुस्तके वाचावीत असा या उपक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानाविषयी माहिती दिली. ग्रंथालयातील जास्तीत जास्त विषयांची पुस्तके वाचली जावीत हा उद्देश समोर ठेऊन हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे असू सांगून त्यांनी पंधरा दिवसांतील विविध वाचनविषयक कार्यक्रमांची माहिती दिली. 

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. कर्मचाऱ्यांचे सामुहिक वाचन ही खूप महत्वाची गोष्ट असल्याचे सांगून त्यांनी आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा स्तुत्य असा उपक्रम आयोजित केल्याबद्दल ग्रंथालय विभागाचे कौतुक केले आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, ग्रंथालय समिती समन्वयक  डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. निधी पटवर्धन, डॉ. एस. डी. मधाळे आणि प्रबंधक श्री. नंदकिशोर गोळपकर उपस्थित होते. 

सामुहिक वाचन उपक्रमामध्ये महाविद्यालयाचे कार्यालय, विविध प्रयोगशाळा, ग्रंथालय विभागातील कर्मचारी यांनी आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करून या उपक्रमात आपला सक्रीय सहभाग नोंदवला. चहापानाने या कार्यक्रमाची सांगता झाली. 

 

Collage Program Collage Program
Comments are closed.