गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात विविध विद्यार्थीभिमुख कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये ग्रंथ प्रदर्शन, विविध पुस्तकपेढी योजना, वाचक गट, विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रम इ. प्रमुख अशा विद्यार्थीप्रिय कार्यक्रमांचा समावेश आहे.
महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्याकरिता पुस्तक पेढी योजना कार्यरत आहे. सदर योजना मुंबई विद्यापीठ अनुदानप्राप्त असून या योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यासण्याकरिता पुस्तकसंच दिला जातो. तसेच ग्रंथालयात वाचन संस्कृती रुजविण्याकरिता ‘वाचक गट’ उपक्रम कार्यरत आहे. ग्रंथालयात नुकताच पुस्तक संच वितरण आणि वाचक गट उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रबंधक श्री. मोहन कांबळे, ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन आणि ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी महाविद्यालयीन ग्रंथालायाविषयी सविस्तर माहिती दिली. ग्रंथालयाचा ग्रंथ संग्रह, ई वाचन साहित्य, नियतकालिक विभाग, ई नियतकालिके, संदर्भ विभाग, इतर योजना आणि उपक्रम यांचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमात सहभाग घेऊन यशस्वी व्हावे असे मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सोई सुविधांचा आढावा घेतला. यामध्ये करियरदृष्ट्या उपलब्ध संधी, इतर कोर्सेस, प्रशिक्षणे, विविध स्पर्धा, स्पर्धा परीक्षा तयारी अशा उपक्रमांची माहिती देताना समृद्ध ग्रंथालयाविषयी उल्लेख केला. आपल्या विद्यार्थी जीवनातील या ग्रंथालयाच्या झालेल्या उपयुक्ततेचा आवर्जून उल्लेख केला. ग्रंथालयाची मुक्तद्वार पद्धती, पुस्तक पेढी योजना, वाचक गट, औपचारिक ग्रंथप्रदर्शने अशा काही विद्यार्थीप्रिय उपक्रमांचा आढावा घेताना त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत इतर विद्यार्थ्यांनाही या प्रवाहात आणण्याचे आवाहन केले; आणि सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
यानंतर लाभार्थी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वर्षभर वापरण्याकरिता पुस्तक संच वितरीत करण्यात आले. यानंतर वाचक गटातील सहभागी विद्यार्थी आणि पुस्तकपेढी योजनेतील विद्यार्थी यांनी आपले प्रतिनिधीक मनोगत व्यक्त केले. यामध्ये शुभराणी होरंबे, शुभम सरदेसाई आणि सचिन अहिवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सहा. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. या कार्यक्रमाला पुस्तक पेढी योजना आणि वाचक गट या उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.