गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात मागासवर्गीय पुस्तक पेढी योजनेंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांना एक वर्षाकरिता ‘पुस्तक संच वितरण’ आणि ‘वाचक गट उद्घाटन’ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर तर ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. मंगल पटवर्धन, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य विवेक भिडे, प्रबंधक श्री. मोहन कांबळे हे मान्यवर उपस्थित होते.
ग्रंथालयाच्या विविध विद्यार्थीभिमुख योजना आणि उपक्रम, सेवा सुविधा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे पुरविण्यात येतात याची माहिती कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल प्रा. किरण धांडोरे यांनी दिली. कोकणातील अतिशय समृद्ध असे आपले ग्रंथालय आहे असे नमूद करताना त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाभिमुख सेवा-सुविधांचा उपयोग आपल्या सर्वांगीण विकासाकरिता करून घ्यावा असे आवाहन केले. पुढे बोलताना त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ‘वाचक गट’ हे एक उत्तम व्यासपीठ असून या उपक्रमातून प्रतिवर्षी आदर्श विद्यार्थी वाचक निवड, साहित्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते; याविषयी सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वर्षभर अभ्यासण्याकरिता पुस्तक संचांचे वितरण करण्यात आले. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी या योजनेच्या लाभ घेतला. प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी पुस्तक पेढी योजना आणि वाचक गट उपक्रमाचा आम्हाला खूप फायदा झाल्याचे आवर्जून नमूद केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी महाविद्यालयातील विविध अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रमांना विद्यार्थ्यांनी ‘प्रतिसाद’ द्यावा असे सांगताना विविध उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकरिता नवीन ‘मोबाईल अॅप’ तयार केले असून याद्वारे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे विविध उपक्रम आणि महत्वाच्या बाबी त्वरित समजण्यास मदत होईल अशी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेला मोकळा वेळ ग्रंथालयात व्यथित केल्यास त्यांनी भावी जीवनात एक दिशा प्राप्त होण्यास मदत होईल असे नमूद करताना वाचनविषयक आपल्या सवयी अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी पुस्तक पेढी योजनेत आणि वाचक गटात सहभागी झालेले विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री. उत्पल वाकडे यांनी केले.